शाळा सुरु होण्यापूर्वी १५ हजार शिक्षकांच्या कोरोना टेस्टचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 04:48 PM2020-11-19T16:48:16+5:302020-11-19T16:50:46+5:30
नववी ते बारावीचे वर्ग असलेल्या शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार
औरंगाबाद : जिल्ह्यातील ११७६ शाळांत ९ ते १२ वीचे वर्ग सोमवारपासून सुरू होत आहेत. या वर्गांना शिकविणाऱ्या १० हजार ४१४ शिक्षकांच्या सोमवारपूर्वी ‘आरटीपीसीआर’ तपासणी करावी लागणार असल्याची माहिती माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण यांनी दिली.
पुढील चार दिवसांत दर दिवशी किमान अडीच हजार तपासण्या करून त्यांचे अहवाल देण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर असणार आहे. नववी ते बारावीचे वर्ग असलेल्या शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्यासाठी बुधवारी दिवसभर बैठकांवर बैठका पार पडल्या. सकाळी १० ते ११ वाजेदरम्यान गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी आणि शिक्षण विभागांची ऑनलाईन बैठक झाली. त्यानंतर ११ ते १२ वाजेपर्यंत शिक्षण आयुक्त विशाल सोळुंके यांनी तयारीची आढावा बैठक घेतली. त्यानंतर जिल्ह्यातील ५०० पेक्षा अधिक मुख्याध्यापकांशी माध्यमिकचे शिक्षणाधिकारी बी. बी. चव्हाण व प्राथमिकचे शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांनी ऑनलाईन संवाद साधत नियोजन केले. शाळा सुरू करण्यापूर्वी शाळेची स्वच्छता, निर्जंतुकीकरण, विद्यार्थ्यांच्या तपासणीसाठी थर्मलगन, पल्स ऑक्सिमीटर, मास्क, सॅनिटायझरची उपलब्धता शाळा व्यवस्थापनाला करावी लागणार आहे.
२५ ते ३० टक्के पालकांचा प्रतिसाद
काही शाळांनी पालकांशी यासंबंधी चर्चा केली. त्यात २५ ते ३० टक्केच पालक पाल्यांना शाळेत पाठविण्यात उत्सुक असल्याचे जाणवले आहे. मात्र, पालकांचे संमतीपत्र सोमवारपर्यंत जमा होतील. बहुतांश विद्यार्थी सोबत येतानाच संमतीपत्र घेऊन येतील. त्यामुळे पहिल्याच दिवशी १०० टक्के उपस्थिती अभिप्रेत नाही. काही जण चार- आठ दिवस वाट पाहून पाल्यांना शाळेत पाठविण्याची शक्यता आहे, असे डॉ. चव्हाण म्हणाले.