सोयगावात लसीकरणाआधी कोरोना चाचणी बंधनकारक - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:02 AM2021-05-27T04:02:22+5:302021-05-27T04:02:22+5:30
सोयगाव : कोरोना प्रतिबंधक लस देण्याआधी लसीकरण केंद्रावर कोरोना चाचणी करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला असून जरंडी लसीकरण केंद्रावर ...
सोयगाव : कोरोना प्रतिबंधक लस देण्याआधी लसीकरण केंद्रावर कोरोना चाचणी करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला असून जरंडी लसीकरण केंद्रावर त्याची सुरुवात झाली; मात्र कोरोना चाचणीच्या भीतीने पहिल्याच दिवशी लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांनी केंद्रावर काढता पाय घेतला.
जिल्हाभरात लसीकरण सुरु असताना प्रशासनाकडून लसीकरणाबाबत वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत. आता थेट लसीकरणासाठी आलेल्या लाभार्थ्याला लसीकरण केंद्रावर आधी कोरोना चाचणीला सामोरे जावे लागत आहे. या निर्णयामुळे एकीकडे कोरोना चाचण्यात वाढ होईल आणि लसीकरणही सुरक्षित होईल, असा जिल्हा प्रशासनाचा उद्देश आहे; मात्र लसीकरण केंद्रावर आलेले अनेक नागरिक याकडे दुर्लक्ष करीत आहेत. कोव्हिशिल्डसाठीच हा निर्णय
कोव्हिशिल्ड लस ही ४५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना दिली जात आहे. लसीकरण अधिक सुरक्षित होण्यासाठी प्रशासनाने थेट लसीकरण केंद्रांवर चाचण्या घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये एकाच दगडात दोन पक्षी मारले जातील, असा प्रशासनाने दावा केला; मात्र लसीकरण केंद्रावर कोरोना चाचण्या होत असल्याचे पाहून सोमवारी पहिल्याच दिवशी अनेकांनी लसीकरण केंद्रावरून पळ काढला होता. त्यामुळे जरंडीला केवळ १४ जणांच्या चाचण्या करून लसीकरण करण्यात आले.
कोट
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग कमी झाला की नाही यासाठी गावागावात चाचण्या करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. त्यासाठी आरोग्य विभागाकडून गावागावात चाचण्या घेतल्या जात आहेत; मात्र आता लसीकरण केंद्रावरही चाचणी करूनच संबंधितांना सुरक्षित लसीकरण करण्याचा निर्णय जिल्हास्तरावर घेण्यात आला आहे. - डॉ. श्रीनिवास सोनवणे, तालुका आरोग्य अधिकारी.