कोरोनाने घेतला ग्रामीण भागातील पाचशे नागरिकांचा जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:05 AM2021-04-16T04:05:01+5:302021-04-16T04:05:01+5:30
ज्ञानेश्वर भाले औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक तीव्र आहे. दिवसागणित रुग्णांची संख्या वाढत असून, ...
ज्ञानेश्वर भाले
औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक तीव्र आहे. दिवसागणित रुग्णांची संख्या वाढत असून, बाधितांचा आकडा १९ हजार ६३९ पर्यंत पोहोचला आहे. यात जवळपास पाचशे नागरिकांचे जीव कोरोनारूपी राक्षसाने घेतल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनासंबंधी नियमांचे पालन होत नसल्याने बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यात गंगापूर तालुक्यातील सर्वाधिक चार हजार ३९५ रुग्ण असून, ८८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापाठोपाठ कन्नडमध्ये तीन हजार ३०८ रुग्ण, ११० मृत्यू, पैठणमध्ये तीन हजार २२१ रुग्ण, ५३ मृत्यू तर औरंगाबाद तालुक्यात तीन हजार १४५ रुग्ण असून, २९ जणांचा जीव कोरोनाने घेतला आहे. प्रशासकीय स्तरावर जनजागृती करूनसुद्धा बहुतांश नागरिक नियमांकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. परिणामी बाधितांचा आकडा औरंगाबाद शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक वाढत असल्याचे पुढे येत आहे. जिल्ह्यातील तब्बल ९३४ गावांत कोरोनाचा शिरकाव झाला असून, सातत्याने संबंधित गावात रुग्ण आढळून येत आहे. यासह आतापर्यंत जिल्ह्यातील ३१५ गावांनी कोरोनाला आपल्या गावात प्रवेश करू दिला नाही.
----- कोट ----
ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ग्रामपंचायत स्तरावर जनजागृती व उपाययोजना केल्या जात आहे. आमच्या गावात सध्या कोरोनाचा एकच रुग्ण आहे. मात्र इतर गावात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने व्यापक स्वरूपात जनजागृती करत तातडीने उपाययोजना कराव्यात.
- सरला तांदळे, गणोरी, सरपंच