लसीकरणात औरंगाबाद जिल्हा पिछाडीवरून आघाडीवर, मराठवाड्यात ठरला अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2021 06:15 PM2021-12-07T18:15:26+5:302021-12-07T18:22:33+5:30
corona vaccination in Aurangabad : जिल्ह्यातील १६ लाख ८६ हजार नागरिकांना पहिला डोस देत ७८ टक्के उद्दिष्ट गाठले गेले.
औरंगाबाद : लस घेतली नसेल तर रेशन मिळणार नाही, असा जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा मिळताच ग्रामीण भागात रांगा लावून नागरिकांनी लस घेण्यास सुरुवात केली (corona vaccination in Aurangabad ). लसीकरणाच्या बाबतीत सतत पिछाडीवर असलेल्या औरंगाबाद जिल्ह्याने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या जालना जिल्ह्याला मागे टाकत मराठवाड्यात प्रथम स्थान पटकावत १६ लाख ८६ हजार (राज्यात १६व्या स्थानी) नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले. रविवारपर्यंत जिल्ह्यातील ७८ टक्के नागरिकांनी पहिला डोस, तर ३१ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.
ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यातील केवळ ४६ टक्के नागरिकांनी लस घेतली होती. यानंतर जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी ९ तालुक्यांसाठी प्रत्येकी एक नोडल अधिकारी नियुक्त केला आणि लसीकरण मोहिमेत तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, जि. प., पं.स. पदाधिकाऱ्यांची मदत घेतली. लसीकरणाला प्रतिसाद न देणाऱ्या गावांत स्वत: मुक्कामी राहून नागरिकांना प्रोत्साहन दिले. यानंतर सर्व यंत्रणा झाडून कामाला लागली आणि महिनाभरात लसीकरणाला वेग आला. सतत पिछाडीवर असलेला औरंगाबाद जिल्हा आज मराठवाड्यात अव्वलस्थानी आला आहे. जिल्ह्यातील १६ लाख ८६ हजार नागरिकांना पहिला डोस देत ७८ टक्के उद्दिष्ट गाठले गेले.
‘हर घर दस्तक’च्या पाहणीत २ लाख लोकसंख्या कमी
कोविड लसीकरण मोहीम १०० टक्के पूर्ण करण्यासाठी जि. प.ने अंगणवाडी कर्मचाऱ्यांमार्फत प्रत्येक घरात जाऊन मतदार यादीनुसार १८ वर्षांवरील किती नागरिकांचे लसीकरण झाले, याची माहिती घेतली. मतदार यादीनुसार जिल्ह्यात २१ लाख ६९हजार नागरिक लसीकरणासाठी पात्र आहेत. मात्र, प्रत्यक्ष पाहणीत ही संख्या दोन लाखांनी कमी असल्याची माहिती समोर आली. या माहितीची पडताळणी आता जि. प.ने सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले. या आकडेवारीत तथ्य असल्यास विद्यमान लसीकरणाची टक्केवारी ८७ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते.
मराठवाड्याची क्रमवारी
जिल्हा क्रम
औरंगाबाद १६ वा
उस्मानाबाद २३ वा
लातूर २७ वा
परभणी २८ वा
हिंगोली ३२ वा
बीड ३३ वा
नांदेड ३४ वा