Corona Vaccination: औरंगाबादेत लसीचा काळाबाजार; मोफत काेराेना लसीची प्रत्येकी ३०० रुपयांना विक्री
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 08:16 AM2021-08-10T08:16:47+5:302021-08-10T08:18:20+5:30
प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवक गणेश दुरोळे यास अटक
औरंगाबाद : आरोग्य विभागाचे कर्मचारी लसीचा काळाबाजार करीत असल्याचे सोमवारी औरंगाबादमधील साजापुरात उघड झाले. कामगारांकडून प्रत्येकी ३०० रुपये घेऊन चोरी छुपे लस देताना जिकठाण प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवक गणेश दुरोळे यास पोलिसांनी पकडले.
साजापूरच्या एका घरात पैसे घेऊन कामगारांना लस देत असल्याचे रांजणगाव शेणपुंजी येथील शिवसेनेचे कार्यकर्ते निखिल कोळेकर यांना समजले. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी एक पथक रवाना केले असता गणेश दुरोळे त्या घरात लस देत होता. पोलीस पथकाने छापा मारून दुरोळेला ताब्यात घेतले. त्याच्याकडून लसीच्या दोन वायल्स, सिरिंज आणि लसीकरण केलेल्या कामगारांची यादी पोलिसांनी जप्त केले. गणेश याने गुन्ह्याची कबुली दिली. यात सहभागी आरोग्यसेवक सय्यद अमजद याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
कोरोनाचे लसीकरण जास्तीत जास्त व्हावे म्हणून सरकार प्रयत्नशील आहे. असे असताना या लसीची चोरी अथवा काळाबाजार होत असेल ती बाब अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणात पोलीस आणि आमच्या यंत्रणेला चौकशीचे निर्देश दिले आहेत.
- राजेश टोपे, आरोग्यमंत्री