फ्रंटलाईन योद्ध्यांचे लसीकरण; पोलीस आयुक्त, पोलीस अधिक्षकांनी घेतली कोरोना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 06:44 PM2021-02-20T18:44:51+5:302021-02-20T18:47:10+5:30
Corona vaccine पोलीस आयुक्त डाॅ. निखील गुप्ता, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, पोलीस उपायुक्त मीना मकवाना यांनी लस घेतली
औरंगाबाद : जिल्हा सामान्य रुग्णालयात पोलीस आयुक्त डाॅ. निखील गुप्ता, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, पोलीस उपायुक्त मीना मकवाना यांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईतील ढाल म्हणजेच कोरोना प्रतिबंध लसीचा पहिला डोस घेतला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लस घेतल्याने पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये लस टोचून घेण्यासाठीचा उत्साह शनिवारी दिसून आला.
पोलीस आयुक्त डाॅ. गुप्ता व पोलीस अधीक्षक पाटील लसीकरणासाठी येणार असल्याची माहीती मिळताच जिल्हा रुग्णालयात आरोग्य कर्मचाऱ्यांची उत्सुकता वाढली होती. परिचारिका रेश्मा शेख यांनी लस टोचली. त्यांनी लसीकरणानंतर डाॅक्टरांशी चर्चा केली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डा. सुंदर कुलकर्णी, मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. निता पाडळकर, अतिरीक्त जिल्हा शल्यचिकित्सक डा्ॅ. कमलाकर मुदखेडकर, डाॅ. संतोष नाईकवाडे, परिचारीका कुसुम भालेराव यांची यावेळी उपस्थिती होती.
लस घ्या, त्रिसुत्री पाळा, सहकार्य करा
कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढायला लागली आहे. लस घेतली म्हणजे कोरोना होणार नाही, असे नाही. लस घेतली असेल किंवा नसेल तरिही काळजी घेणे आवश्यक आहे. मी लस सुरक्षित आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनीही लस घ्यावी व त्रिसुत्रीचे पालन करावे असे आवाहन पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी केले. तर पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी ग्रामीण भागात कार्यक्रमांतून सोशल डिस्टंन्सींग, मास्क वापराकडे दुर्लक्ष होतांना दिसून येत असुन नागरीकांना सुरक्षिततेसाठी दिलेल्या निर्बंधाचे पालन करुन सहकार्य करावे तसेच लस सुरक्षित असुन जेव्हाही लस घेण्यासाठी बोलवण्यात येईल त्यावेळी येवून लस घ्यावी असे आवाहन केले.