एकाच युजरनेमने दहा ठिकाणी लसीकरण; निलंबित आरोग्य नर्स आणि सेविकेची सीईओंकडे धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2022 06:02 PM2022-01-01T18:02:56+5:302022-01-01T18:04:23+5:30
लस न घेता कोविन ॲप्लिकेशनवरून लस घेतल्याचे बोगस प्रमाणपत्र घेतलेल्या शहरातील काही लोकांचा गुन्हे शाखेने काही दिवसांपूर्वी पर्दाफाश केला आहे.
औरंगाबाद : बोगस लसीकरण प्रमाणपत्र दिल्याच्या आरोपावरून शिऊर आणि मनूर (ता.वैजापूर) प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय नर्स आणि आरोग्य सेविकांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांचा बोगस लसीकरण प्रमाणपत्राशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले. एकाच युजर आय.डी.वरून प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत दहा ते पंधरा ठिकाणी लसीकरण होते. केवळ युजर नेम आहे, म्हणून आमच्यावर करण्यात आलेली कारवाई अन्यायकारक असल्याचे त्यांनी नमूद केले.
लस न घेता कोविन ॲप्लिकेशनवरून लस घेतल्याचे बोगस प्रमाणपत्र घेतलेल्या शहरातील काही लोकांचा गुन्हे शाखेने काही दिवसांपूर्वी पर्दाफाश केला. बोगस प्रमाणपत्र वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहिउद्दीन शेख फहीम यांच्याकडून पैसे देऊन घेण्यात आल्याचे समोर आले होते. याप्रकरणी डॉ.शेख यांच्यासह लसीकरण करणारे म्हणून तालुक्यातील शिऊर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविका उषा आढाव आणि मनूर प्रा.आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका शहेनाज शेख यांची नावे असल्याने आरोपी करण्यात आले होते. हे प्रकरण समोर येताच मुख्य कार्यकारी अधिकारी गटणे यांनी डाॅ. शेख यांच्यासह आरोग्य सेविकांना निलंबित केले.
निलंबित आरोग्य सेविकांसह जि.प. आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. त्यांनी नमूद केले की, एका प्राथमिक आरोग्य केंद्रावर आरोग्य सेविका या लस टोचक म्हणून काम करतात. कोविन ॲपवर यूजर नेम म्हणून आरोग्य सेविकेचे नाव आहे. एका यूजर आयडीवरून प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत दहा ते पंधरा ठिकाणी लसीकरण होते. आपल्या युजर आयडी आणि पासवर्डचा वापर करून कुणी तरी बोगस लसीकरण प्रमाणपत्र दिले आहे. याचा तपास पोलीस करीत आहेत; मात्र आमचा दोष नसताना निलंबित केल्याने अन्याय झाल्याचे नमूद केले.