औरंगाबादेतून ७ जिल्ह्यांना कोरोना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:02 AM2021-01-08T04:02:11+5:302021-01-08T04:02:11+5:30
औरंगाबाद : शहरातील छावणी परिसरात प्रत्येकी २० क्युबिक मीटर क्षमतेचे लस साठवणुकीचे २ युनिट (स्टोअर) तयार केले जात आहे. ...
औरंगाबाद : शहरातील छावणी परिसरात प्रत्येकी २० क्युबिक मीटर क्षमतेचे लस साठवणुकीचे २ युनिट (स्टोअर) तयार केले जात आहे. त्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. येथून आरोग्य उपसंचालक कार्यालयाच्या औरंगाबाद विभागासह लातूर विभागालाही लस पाठविण्यात येणार आहे. म्हणजेच, औरंगाबादेतून ७ जिल्ह्यांना कोरोना लसचा पुरवठा होणार आहे.
छावणी येथे तयार करण्यात येणाऱ्या युनिटच्या कामाची सोमवारी आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्निल लाळे, डॉ. गणेश कल्याणकर, औषधनिर्माण अधिकारी वर्षा औटे यांनी पाहणी केली. बांधकाम, विद्युतीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. त्यानंतर शीतगृहाचे काम होणार आहे. छावणीत यापूर्वी १२ क्युबिक मीटर क्षमतेचे वॉक इन कुलर आहे. त्यापाठोपाठ आता लवकरच प्रत्येकी २० म्हणजे, ४० क्युबिक मीटर क्षमतेचे युनिट लस साठवणुकीसाठी सज्ज होणार आहे. शिवाय, सिडकोतील कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात वॉक इन फ्रीजर आणि वॉक इन कुलर आहे. या दोन्हींची क्षमता प्रत्येकी १२ क्युबिक मीटर आहे.
आरोग्य उपसंचालक कार्यालयाच्या औरंगाबाद विभागाअंतर्गत औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली हे चार जिल्हे आहेत. तर लातूर आरोग्य उपसंचालक कार्यालयाअंतर्गत लातूर, उस्मानाबाद, नांदेड आणि बीड हे चार जिल्हे आहेत. औरंगाबादशिवाय या ७ जिल्ह्यांना येथून लस पाठविण्यात येणार आहे.
मुंबईत येणार आधी लस
१ क्युबिक मीटर म्हणजे एक हजार लिटरची क्षमता होते. त्यामुळे औरंगाबादेत पुरेशा प्रमाणात लस साठवणूक शक्य होणार आहे. मुंबई येथे सर्वप्रथम लस येतील. तेथून राज्यभरात लसचे वितरण होण्याची शक्यता आहे.
फोटो ओळ..
छावणीत तयार करण्यात येणाऱ्या लस साठवणुकीच्या युनिटच्या कामाची पाहणी करताना आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्निल लाळे, डॉ. गणेश कल्याणकर, औषध निर्माण अधिकारी वर्षा औटे.