Corona Vaccine : एक अब्ज डोस उत्पादनाची क्षमता, आणखी एका लसीच्या उत्पादनासाठी औरंगाबादच्या वोक्हार्टच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 12:54 PM2021-05-27T12:54:09+5:302021-05-27T12:59:39+5:30
Corona Vaccine : वोक्हार्ट इंग्लंडमधील कंपनीच्या सहकार्याने जागतिक बाजारपेठेत कोरोना नियंत्रणाची लस आणणार असून, पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटनंतर लसींचे उत्पादन करणारी वोक्हार्ट ही राज्यातील दुसरी कंपनी ठरणार आहे.
- विकास राऊत
औरंगाबाद : वोक्हार्ट या फार्मास्युटिकल्स कंपनीच्या येथील शेंद्रा पंचातारांकित औद्योगिक वसाहतीत असलेल्या प्रकल्पातून कोरोना नियंत्रणावरील लसींचे उत्पादन करण्यात येणार आहे. याबाबत इंग्लंडमधील कंपनीशी कराराच्या अनुषंगाने सुरू असलेली बोलणी अंतिम टप्प्यात असून, येथील प्रकल्पात त्यानुसार कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळाली.
वोक्हार्ट इंग्लंडमधील कंपनीच्या सहकार्याने जागतिक बाजारपेठेत कोरोना नियंत्रणाची लस आणणार असून, पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटनंतर लसींचे उत्पादन करणारी वोक्हार्ट ही राज्यातील दुसरी कंपनी ठरणार आहे. गेल्यावर्षी वोक्हार्ट कंपनीच्या इंग्लंडमधील प्रकल्पाला तेथील उच्चस्तरीय शिष्टमंडळाने भेट दिल्यानंतर लस उत्पादनाबाबत चर्चा केली होती. त्यानुसार औरंगाबाद येथील शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील बायोटेक पार्कमध्ये लसींचे उत्पादन सुरू करण्याचे हळूहळू निश्चित होत आहे.
उत्पादन किती असेल, वर्षाकाठी किती लसीचे उत्पादन करण्यात येणार असून, त्याचे नाव काय असेल, याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समजू शकलेली नाही. इंग्लंडमधील कंपनीच्या सहकार्याने वोक्हार्ट स्वत: लसीचे उत्पादन करून बाजारपेठेत आणणार असल्याचे समजत आहे. शेंद्रा येथील प्रकल्पात उत्पादन क्षमता मोठी असून, यासाठी कंपनी तातडीने शेंद्र्यात विस्ताराची योजनादेखील हाती घेऊ शकते, अशी उद्योग वर्तुळात चर्चा आहे. या उत्पादनांच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांचे मागील वर्षाचे थकीत इन्सेटिव्ह देण्याची प्रक्रिया कंपनीत सुरू असल्याची माहिती समजली आहे. १ हजारच्या आसपास मनुष्यबळ उत्पादन प्रक्रियेत लागण्याची शक्यता आहे. या लसीच्या उत्पादनामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपनीच्या इतर उत्पादनांना चालना मिळण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे कोरोनावरील लस उत्पादनात कंपनी पाऊल टाकत असल्याचे दिसते. गेल्यावर्षी केंद्र सरकारच्या यादीत लस उत्पादनात वोक्हार्टचा समावेश नव्हता.
शेंद्र्यातच उत्पादन होणार
वोक्हार्ट बायोटेक पार्क येथील वरिष्ठ सूत्रांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन या लसींप्रमाणेच स्वतंत्र लस उत्पादन करण्यात येणार आहे. ते उत्पादन येथेच होणार आहे. लसीचे उत्पादन आम्ही शेंद्र्याच्या प्रकल्पात करणार आहोत. काही बाबी इंग्लंडमधील कंपनी आणि वोक्हार्ट यामध्ये गोपनीय आणि करारांतर्गत आहेत. त्यामुळे याबाबत जास्तीची माहिती देता येणार नाही.