Corona Vaccine : डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरण अवघडच; या गतीने लसीकरणासाठी लागणार दोन वर्षे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 07:06 PM2021-05-31T19:06:34+5:302021-05-31T19:10:34+5:30
औरंगाबाद जिल्ह्याची लोकसंख्या २०११च्या जनगणनेनुसार ३२ लाख ८७ हजार आहे. वास्तविक पाहता ही लोकसंख्या आता ३८ लाखांपेक्षा अधिक आहे.
- मुजीब देवणीकर
औरंगाबाद : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आली तरी जीवितहानी टाळण्यासाठी देशभरात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. डिसेंबर २०२१पर्यंत देशात लसीकरण पूर्ण होणार, असा दावा केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला. मात्र लसीकरणाची सध्याची संथगती पाहता ते अवघड असून, या गतीने संपूर्ण लसीकरणासाठी आणखी दोन वर्षे तरी लागणार हे निश्चित. औरंगाबाद जिल्ह्यात १६ जानेवारीला लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला. मागील पाच महिन्यांमध्ये जिल्ह्यातील पाच लाख ६४ हजार डोस देण्यात आले.
औरंगाबाद जिल्ह्याची लोकसंख्या २०११च्या जनगणनेनुसार ३२ लाख ८७ हजार आहे. वास्तविक पाहता ही लोकसंख्या आता ३८ लाखांपेक्षा अधिक आहे. जिल्ह्यात ४ लाख ३६ हजार नागरिकांना पहिला डोस दिला आहे. एक लाख २७ हजार नागरिकांना दुसरा डोस मिळाला. पहिल्या डोसची टक्केवारी १३.२८, तर दुसऱ्या डोसची टक्केवारी ३.८९ आहे. लसीकरणाची गती अशीच राहिल्यास जिल्ह्यात १०० टक्के लसीकरणासाठी किमान दोन वर्षे लागतील. शहर आणि ग्रामीण भागातील काही लसीकरण केंद्रांवर आजही लांबलचक रांगा लागत आहेत. मात्र केंद्र शासनाकडून मुबलक प्रमाणात लस उपलब्ध करून देण्यात येत नाही.
२६ मेपर्यंत झालेले लसीकरण
हेल्थलाइन वर्कर - ३९,५६४ (पहिला डोस), २१,३५२ (दुसरा डोस)
फ्रंटलाइन वर्कर - ६३,००६३ (पहिला डोस), २३,५६५ (दुसरा डोस)
१८ ते ४४ - १०, ८३५ (पहिला डोस)
४५ वर्षांपुढील - १,८०, ३४७ (पहिला डोस), ४१,१८६
(दुसरा डोस)
ग्रामीण भागात पहिल्या डोसची टक्केवारी - १०.३६, दुसरा डोस - २.३२
शहरात पहिल्या डोसची टक्केवारी - १८.५२, दुसरा डोस-६.७०
जिल्ह्यात एकूण पहिल्या डोसची टक्केवारी-१३.२८, दुसरा डोस-३.८९
१८ पेक्षा कमी आणि जास्त वयाचे काय?
१८ पेक्षा कमी वयोगटासाठी लस देण्यासंदर्भात कोणतीही हालचाल शासनाकडून नाही. मात्र १८ ते ४४ वयोगटासाठी १ मेपासून लसीकरण मोहीम सुरू केली होती. अवघ्या दहा दिवसांमध्ये लसीकरण मोहीम बंद करण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यात या वयोगटातील नागरिकांची लोकसंख्या सुमारे १२ लाख आहे. विशेष बाब म्हणजे शहरातील चार खासगी रुग्णालयांमध्ये या वयोगटातील नागरिकांना ९०० रुपये शुल्क आकारून लस देण्यात येत आहे. लस कंपन्यांनी खासगी रुग्णालयांना मोठ्या प्रमाणात डोस उपलब्ध करून दिले आहेत.
औरंगाबाद शहरात जम्बो लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. त्यासाठी ११५ लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. ग्रामीण भागात तालुकानिहाय लसीकरण केंद्र सुरू केले. शासनाकडून अत्यंत कमी प्रमाणात लस डोस येत असल्याने शहरातील लसीकरण केंद्राची संख्या आता ६९पर्यंत खाली आली आहे. ग्रामीण भागातील लस केंद्रांची संख्या कमी झाली.
मागील एक महिन्यापासून शासनाकडून वेळोवेळी अल्प प्रमाणात का होईना लस उपलब्ध होत आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेत कोणताही खंड नाही. जास्त प्रमाणात लस डोस उपलब्ध झाल्यास पुन्हा शहरात जम्बो लसीकरण मोहीम राबविता येईल. शहरात दररोज २० हजार नागरिकांना लस डोस देता येईल, अशी यंत्रणा तयार करण्यात आली आहे.
- डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा