कोरोना लसीचे मिळाले ४८ हजार डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:05 AM2021-04-21T04:05:07+5:302021-04-21T04:05:07+5:30
औरंगाबाद : आरोग्य उपसंचालक कार्यालयास मंगळवारी रात्री कोविशिल्ड लसींचे ४८ हजार डोस मिळाले. महापालिकेला बुधवारी सकाळी लसींचा साठा दिला ...
औरंगाबाद : आरोग्य उपसंचालक कार्यालयास मंगळवारी रात्री कोविशिल्ड लसींचे ४८ हजार डोस मिळाले. महापालिकेला बुधवारी सकाळी लसींचा साठा दिला जाईल, अशी माहिती आरोग्य उपसंचालक डाॅ. स्वप्नील लाळे यांनी दिली.
औरंगाबाद जिल्ह्यात ३ लाखांवर लोकांचे लसीकरण झाले आहे. १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस दिली जाणार आहे; परंतु त्यापूर्वीच लसींचा साठा हा चिंतेचा विषय बनत आहे. लस संपल्यामुळे महापालिकेला लसीकरण मोहीम गुंडाळावी लागली. मंगळवारी सायंकाळपर्यंत औरंगाबादेत ५ हजार लसींचा साठा होता. हा साठा दोन दिवस पुरेल इतका आहे. लसींचा पुरवठा कधी होणार, याविषयी काहीही सांगता येणार नाही, असे जिल्हा लसीकरण अधिकारी डाॅ. विजयकुमार वाघ यांनी दिली; परंतु आरोग्य उपसंचालक कार्यालयास रात्री ४८ हजार डोस मिळाले. त्यामुळे आरोग्य यंत्रणेचा जीव भांड्यात पडला. आगामी काही दिवस लसीकरण सुरळीत राहील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
लसीकरणाची गाइडलाइनच नाही
१ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस दिली जाणार आहे; परंतु हे लसीकरण कशा पद्धतीने राबविले जाईल, यासंदर्भात गाइडलाइन प्राप्त झालेले नाही, गाइडलाइन प्राप्त होताच नियोजन केले जाईल, अशी माहिती जिल्हा लसीकरण अधिकाऱ्यांनी दिली.