corona vaccine : लस तुटवड्याने औरंगाबादेत लसीकरण बंद; ५५ हजारांहून अधिक नागरिक दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 11:45 AM2021-07-12T11:45:13+5:302021-07-12T11:46:34+5:30
corona vaccination stopped in Aurangabad : रविवारी एका केंद्रावर कोविशिल्डच्या ४०० लसी अवघ्या एका तासात संपल्या.
औरंगाबाद : केंद्र शासनाकडून लसींचा पुरवठा होत नसल्याने शहरातील नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. दुसरा डोस ८४ दिवसांनंतर घ्या, असे शासनानेच जाहीर केले. १०० दिवस उलटल्यानंतरही अनेकांना लस मिळेना. एकीकडे मोफत लसींचा प्रचंड तुटवडा असताना शहरातील खाजगी रुग्णालयांना पाहिजे तेवढ्या लसी विविध कंपन्या उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या संतापात अधिक भर पडत आहे. ( Large shortage of corona vaccine in Aurangabad )
शहरात लसीकरणासाठी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लस वापरली जाते. रविवारी एका केंद्रावर कोविशिल्डच्या ४०० लसी अवघ्या एका तासात संपल्या. त्यासोबतच कोव्हॅक्सिनच्यादेखील दीडशे लसी शिल्लक असून, तीही संपल्यात जमा आहे. शहरात ५५ हजारांहून अधिक नागरिक दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाकडून शुक्रवारी रात्री फक्त ८ हजार लस देण्यात आल्या. शनिवारी ३९ केंद्रांवर अवघ्या काही तासातच लस संपल्या. ७ हजार नागरिकांना फक्त दुसरा डोस देण्यात आला. ७०० पेक्षा अधिक नागरिकांना पहिला डोस दिला.
डोस न घेताच माघारी फिरावे लागले
या आठवड्यांत चार दिवसानंतर महापालिकेला ८ हजार लस मिळाल्याने शनिवारी ३९ केंद्रावर लसीकरणाचे नियोजन करण्यात आले होते. त्यातही दुसरा डोस घेणाऱ्यांनाच प्राधान्य देण्यात आले. त्याकरिता ३४ केंद्रांवर व्यवस्था केली. लस आल्याचे कळताच सकाळपासूनच केंद्रावर कुपन घेण्यासाठी नागरिकांची गर्दी केली होती. कुपन घेतल्यानंतरही काही नागरिक थेट केंद्रावर लस घेण्यासाठी दाखल झाले. दुसरा डोस घेण्यासाठी नागरिकांची केंद्रावर प्रचंड गर्दी उसळली. प्रत्येक केंद्रावर १५० लसीचे डोस उपलब्ध करून देण्यात आले. दिवसभरात साडेसहा हजार नागरिकाचे लसीकरण झाले. अनेकांना दुसरा डोस न घेताच माघारी फिरावे लागले.
५५ हजार नागरिक डोसच्या प्रतीक्षेत
१८ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला मोफत लस देण्याची घोषणा केंद्राने केली आहे. शहराला दररोज २० हजार डोसची गरज आहे. मात्र, प्रत्यक्षात ८ ते १० हजारच लस मिळत आहे. एकदा साठा मिळाल्यानंतर किमान चार ते पाच दिवस लसीकरण मोहीम बंद ठेवावी लागते. त्यामुळे दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शहरात सध्या ५५ हजारहून अधिक नागरिकांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा आहे.