Corona Vaccine : रात्री ८.३० वाजता लस नोंदणी, पाच सेकंदात हाऊसफुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:08 PM2021-05-12T16:08:07+5:302021-05-12T16:11:35+5:30

Corona Vaccine: ज्या नागरिकांनी कोविन ॲपवर नोंदणी केली आहे, त्यांनाच लस देण्यात येत आहे.

Corona Vaccine: Vaccine registration starts at 8.30 pm, housefull in five seconds | Corona Vaccine : रात्री ८.३० वाजता लस नोंदणी, पाच सेकंदात हाऊसफुल्ल

Corona Vaccine : रात्री ८.३० वाजता लस नोंदणी, पाच सेकंदात हाऊसफुल्ल

googlenewsNext
ठळक मुद्दे१८ ते ४५ या वयोगटातील नागरिकांना लस नोंदणीसाठी प्रचंड त्रासएका केंद्रावर दोनशेपेक्षा अधिक नागरिकांना लस देण्याची सोय नाही.

औरंगाबाद : केंद्र शासनाने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस घेण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक केली आहे. कोविन ॲपवर ही नोंदणी करावी लागते. औरंगाबाद शहरात दररोज रात्री ८.३० वाजता ॲप नोंदणीसाठी उघडण्यात येते. अवघ्या पाच सेकंदात एका केंद्रावर तब्बल २०० नागरिकांचे बुकिंग होते. अवघ्या पाच ते दहा मिनिटांचे अंतर ठेवून दुसऱ्या केंद्राची नोंदणी सुरू होते. एकूण सहा केंद्रांवर नोंदणी करण्यात येते. काही मिनिटात संपणाऱ्या या प्रक्रियेमुळे हजारो नागरिक नोंदणी करण्यापासून वंचित राहात आहेत.

केंद्र शासनाने १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्याची घोषणा केली. महाराष्ट्र शासनाने अत्यंत कमी प्रमाणात का होईना कोव्हॅक्सिन लस देण्यास सुरुवात केली. औरंगाबाद शहरात यासाठी ६ केंद्र उघडली आहेत. सकाळी १० ते ४ या वेळेत लसीकरण करण्यात येते. ज्या नागरिकांनी कोविन ॲपवर नोंदणी केली आहे, त्यांनाच लस देण्यात येत आहे. एका केंद्रावर दोनशेपेक्षा अधिक नागरिकांना लस देण्याची सोय नाही. ज्यांनी नोंदणी केलेली नाही, त्यांनी केंद्रावर अजिबात येऊ नये, असे सांगितलेले आहे. शासनाने ठरवून दिलेल्या केंद्रावरच लसीकरण करावे लागते. महापालिकेला स्वतःच्या मर्जीने केंद्र वाढवता येत नाही. ॲपशिवाय जास्त नागरिकांना लस देता येत नाही.

८.३० वाजता ऑनलाईनची प्रक्रिया सुरू
दररोज रात्री ८.३० वाजता हजारो नागरिक नोंदणीसाठी प्रयत्न करतात. अवघ्या पाच सेकंदात ॲपवरील २०० जणांची नोंदणी संपते. इतर पाच केंद्रांवर थोड्या थोड्या अंतराने ॲप सुरू करण्यात येते. मात्र, तेथेही अशीच परिस्थिती असते. नोंदणी होत नसल्यामुळे हजारो नागरिक दररोज रात्री नोंदणीचा प्रयत्न करतात. पण, त्यांना यश येत नाही. नेहमी ॲपवर नोंदणी करणाऱ्यांना ही प्रक्रिया सोपी जात आहे.

एक आठवड्यापासून प्रयत्न करतोय
कोविन ॲपवर नोंदणी करण्यासाठी मागील आठ ते दहा दिवसांपासून दररोज रात्री प्रयत्न करीत आहे. अवघ्या काही सेकंदात केंद्रावर नोंदणी पूर्ण झालेली असते. दररोज प्रयत्न केल्यानंतरही यश मिळायला तयार नाही. शासनाने नोंदणी करण्यासाठी किमान वेळ तरी वाढवून द्यावा. अशा पद्धतीने नोंदणी होत राहिल्यास असंख्य नागरिकांना वर्षानुवर्षे लसच मिळणार नाही. ज्यांनी नोंदणी केली आहे, त्यांना किमान ८ दिवस, १० दिवसानंतरची वेळ तरी दिली पाहिजे.
- राजू तुपे, हर्सूल

शासनाला त्रासाची जाणीव नाही 
१८ ते ४४ वयोगटातील प्रत्येक नागरिकाकडे अँड्रॉईड फोन असेलच असे नाही. ज्यांच्याकडे आहे त्याच्यातील अनेकांना नोंदणी कशी करावी, हेच माहीत नाही. त्यामुळे लस मिळावी म्हणून असंख्य नागरिक त्रस्त आहेत. नागरिकांना होणाऱ्या त्रासाची जाणीव शासनाला नाही. हजारो नागरिक लस घेण्यासाठी तयार असतानाही किचकट प्रक्रियेतून वेळ काढण्याचे धोरण स्वीकारले जात आहे.
- अमेय दिवाकर देशमुख, एन-८

लस उपलब्ध करून द्यावी 
४५ पेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना ज्या पद्धतीने केंद्रावर बोलावून लसीकरण करण्यात येत आहे, त्याच पद्धतीने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना टप्प्याटप्प्यात बोलावून किंवा टोकन पद्धतीने लसीकरण करायला हरकत नाही. दिवसभरातून सहाशे लसीकरण करण्यापेक्षा सहा हजार तरी संख्या ठेवावी. शहराची जेवढी गरज आहे, तेवढी लस शासनाने दिली पाहिजे.
- सागर पाले, हडको.

शासन नियमानुसारच लसीकरण
लसीकरणासाठी शासनाने नियमावली ठरवून दिलेली आहे. या नियमावलीच्या बाहेर महापालिकेला जाता येत नाही. कोविन ॲप केंद्र शासनाने तयार केलेले आहे. लसीचा साठा प्राप्त झाल्यानंतर ४५ वरील नागरिकांना केंद्रावर बोलावून लस देण्यात येत आहे. २ लाख ६६ हजार नागरिकांना आतापर्यंत लस देण्यात आली आहे. शासनाकडून लसीकरणात जसजसे बदल करण्यात येतील, तशी अंमलबजावणी आमच्याकडून होते.
- डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा.

Web Title: Corona Vaccine: Vaccine registration starts at 8.30 pm, housefull in five seconds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.