कोरोनायोद्ध्यांच्या शिलेदारांनी घेतली कोरोना लस; आरोग्य अधिकाऱ्यांनी लस घेताच वाढले प्रमाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 01:16 PM2021-01-23T13:16:28+5:302021-01-23T13:21:20+5:30
corona vaccine लसीकरण सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच लसीकरण ७७ टक्क्यांवर गेले.
औरंगाबाद : रिॲक्शन.. साइड इफेक्ट आणि दुष्परिणामाची भीती ही सगळी स्थिती शुक्रवारी कोरोनायोद्ध्यांच्या शिलेदारांनी म्हणजेच वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी लसीचा डोस स्वतः घेत दूर केली. लसीकरण सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच लसीकरण ७७ टक्क्यांवर गेले.
आरोग्य उपसंचालक डाॅ. स्वप्नील लाळे, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. सुंदर कुलकर्णी, मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. नीता पाडळकर, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी मुजीब सय्यद, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ, मनपा हॉस्पिटलचे व्यवस्थापक डॉ. विशाल पट्टेकर, स्रीरोग तज्ज्ञ डाॅ. सुनिला लाळे, डॉ. व्ही. एस. विखे, न्यूरो फिजिशियन डॉ. माजेद यांच्यासह वरिष्ठ डाॅक्टरांनी धूत हाॅस्पिटल येथे लस घेतली. यावेळी डाॅ. हिमांशू गुप्ता यांच्यासह डाॅ.अर्चना राणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोरोना लसीकरण मोहिमेला आरोग्य कर्मचाऱ्यांकडून अल्पप्रतिसाद मिळत होता. तीन दिवसाच्या लसीकरणात १५०० पैकी ९२५ कर्मचाऱ्यांनी लस घेतली. लसीकरणाच्या चाैथ्या दिवशी दिवसभरात ७७२ जणांना जिल्ह्यात लस देण्यात आली. यात धूत हाॅस्पिटल १५४, एमजीएम रुग्णालयात १६०, हेडगेवार रुग्णालयात ७४, कमलनयन बजाज रुग्णालयात ४१, मेडिकव्हर हाॅस्पिटल ४८, घाटीमध्ये ३९ असे शहरात सहा केंद्रांवर सहाशेपैकी ५१६ तर ग्रामीणमध्ये वैजापूर ६७, सिल्लोड ८३, पाचोड ५१, अजिंठा ५५ असे ग्रामीणमध्ये ४०० पैकी २५६ जणांना लस देण्यात आली, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
रिॲक्शनची भीती बाळगण्याची गरज नाही
लस घेतल्यानंतर जिल्हा रुग्णालयात आलो. सायंकाळपर्यंत नियमित कामकाज केले. राज्यपालांसोबतच्या व्हीसीलाही उपस्थित होतो. काहीही त्रास जाणवला नाही. त्यामुळे रिॲक्शनची कोणतीही भीती बाळगण्याची गरज नाही, असे मला वाटते. जिल्हा रुग्णालयातील इतर डाॅक्टरांनीही लस घेतली. त्यांनाही कोणताच त्रास झाला नाही.
- डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक, औरंगाबाद