corona virus : केंद्र शासनाने दिलेले औरंगाबादचे ५५ व्हेंटिलेटर परभणी, बीड, हिंगोली जिल्ह्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 02:49 PM2021-05-04T14:49:42+5:302021-05-04T14:51:46+5:30
corona virus in Aurangabad : जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपासून व्हेंटिलेटरची सुविधा असलेले बेड उपलब्ध होत नसल्यामुळे अनेकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांसाठी सरकारी आणि खासगी हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर उपलब्ध होत नसताना केंद्र सरकारने दिलेले शंभरपैकी ५५ व्हेंटिलेटर परभणी, बीड, हिंगोली जिल्ह्यात देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी याबाबत नाराजी व्यक्त करून जिल्ह्याच्या गरजा पूर्ण करण्याची मागणी केली.
जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपासून व्हेंटिलेटरची सुविधा असलेले बेड उपलब्ध होत नसल्यामुळे अनेकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. केंद्र शासनाने दिलेले व्हेंटिलेटर गेले कुठे, याचा जाब लोकप्रतिनिधींनी बैठकीत विचारला. जिल्ह्यात सध्या ४४१ व्हेंटिलेटर उपलब्ध असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात व्हेंटिलेटर बेड्सविना गंभीर रुग्ण ताटकळत आहेत तर दुसरीकडे शासनाकडून आलेले व्हेंटिलेटर उपलब्ध होऊनही ते इतर जिल्ह्यांना का दिले, असा प्रश्न खासदार डॉ. भागवत कराड, खासदार इम्तियाज जलील, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे यांनी विचारला.
केंद्राने दिले २०० व्हेंटिलेटर
गेल्यावर्षी केंद्र सरकारने जिल्ह्यासाठी १०० व्हेंटिलेटर दिले होते. त्यातील ६०हून अधिक व्हेंटिलेटर बिघडले होते, ते प्रशासनाने दुरुस्त करून घेतले. दुसऱ्या लाटेतही केंद्राकडून जिल्ह्याला पुन्हा १०० व्हेंटिलेटर दिले होेते. त्यातील ५५ व्हेंटिलेटर परभणी, हिंगोली आणि बीड जिल्ह्याला देण्यात आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने बैठकीत सांगितले.