Corona Virus : औरंगाबादमध्ये कोरोनाचे आणखी ८ संशयित; अहवालांची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 06:31 PM2020-03-29T18:31:10+5:302020-03-29T18:31:58+5:30
संशयितांचा आलेख वाढता आहे
औरंगाबाद : औरंगाबादेत शनिवारी कोरोनाचे आणखी ८ संशयित समोर आले. या आठही संशयितांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.
जिल्हा रुग्णालयात शनिवारी दिवसभरात ११२ लोकांची तपासणी करण्यात आली. यात ३७ लोकांना होम क्वारंटाइनचा सल्ला देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही.कुलकर्णी यांनी दिली. जिल्हा रुग्णालयात २ आणि घाटी रुग्णालयात ९ संशयित दाखल आहेत. दिवसभरात ८ जणांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका रुग्णाचाही लाळेचा नमुना घेण्यात आला आहे.
घाटी रुग्णालयाने २७ मार्चपासून २८ मार्च रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत ६० जणांची तपासणी केली. यातील चौघा संशयितांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले. याबरोबरच सारीचे ९ रुग्ण दाखल असल्याचे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले.
५ हजार प्रवाशांत चौघांत लक्षणे
महापालिकेतर्फे गेल्या २४ तासांत नगरनाका, केंम्ब्रिज नाका, हर्सूल नाका येथे ५ हजार ३२१ प्रवाशांची स्क्रिनिंग करण्यात आली. त्यात ४ प्रवाशांमध्ये सर्दी, खोकला, ताप, दम लागणे अशी लक्षणे आढळून आली. एका प्रवाशाचे अलगीकरण करण्यात आले, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली.
आजपर्यंत घेतले १०७ नमुने
जिल्हा रुग्णालयाने आजपर्यंत १०९ नमुने तपासणीसाठी घेतले. यात ९७ अहवाल प्राप्त झाले. १० अहवाललांची प्रतीक्षा आहे, असे डॉ. एस.व्ही. कुलकर्णी यांनी सांगितले.
आजवर १२१ संशयित
घाटी आणि जिल्हा रुग्णालयात कोरोना संशयित म्हणून नोंद झालेल्या रुग्णांची संख्या १२१ वर गेली आहे. यात घाटीत १९ तर जिल्हा रुग्णालयात ४४ जणांना दाखल करण्यात आले होते. दररोज घाटी आणि जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी अनेक लोक धाव घेत आहेत.