५० टक्के कोरोना रुग्ण होम क्वारंटाईन, तरीही रुग्णालयांत बेड मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 06:19 PM2021-04-02T18:19:13+5:302021-04-02T18:22:09+5:30
corona virus in Aurangabad : एकीकडे कोरोनाची परिस्थिती बिकट होत असताना, गंभीर रुग्णांना बेड मिळविण्यासाठी प्रचंड तारेवरची कसरत करावी लागत आहे.
औरंगाबाद : शहरात १० हजार ९१५ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील ५० टक्के रुग्ण होम आयसोलेशनमध्ये घरी थांबलेले आहेत. शासकीय, खासगी रुग्णालयांमध्ये ५० टक्केच रुग्णांवर उपचार सुरू आहेत. असे असतानाही शहरात सध्या कोठेही गंभीर रुग्णांसाठी बेड उपलब्ध नाहीत. शहरात उपचार घेण्यासाठी मराठवाड्यासह खान्देश आणि नाशिकपर्यंतचे रुग्ण येत आहेत. इतर जिल्ह्यांतील रुग्णांची माहिती खासगी रुग्णालये महापालिकेला देण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे.
मार्चच्या प्रारंभापासून शहर आणि परिसरात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झालेला आहे. शंभरातील ३५ ते ४० रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे हे प्रशासनाने वारंवार सांगितले. आजची परिस्थिती आहे त्यात सुधारणा होण्याऐवजी अधिकच बिकट होण्याचा अंदाज आरोग्य विभागाला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने मोठ्या प्रमाणात तयारी सुरू केली आहे. शहरात दररोज दहा हजार नागरिकांची तपासणी, महिनाभरात २ लाख नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे.
एकीकडे कोरोनाची परिस्थिती बिकट होत असताना, गंभीर रुग्णांना बेड मिळविण्यासाठी प्रचंड तारेवरची कसरत करावी लागत आहे. शहरातील खासगी रुग्णालये बेड उपलब्धच नसल्याचे राजरोसपणे सांगत आहेत. यासंदर्भात माजी महापौर बापू घडामोडे यांनी गुरुवारी सोशल मीडियावर खासगी रुग्णालयांच्या वागणुकीबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. शहरात ५० टक्के रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असताना, एवढी विदारक अवस्था झालेली आहे. खासगी रुग्णालयांनी, दररोज किती बेड रिकामे आहेत, त्याचा अहवाल महापालिकेला दिला पाहिजे. पण तो सुद्धा दिला जात नाही.
इतर जिल्ह्यांतील रुग्ण शहरात
खासगी रुग्णालयांमध्ये मराठवाड्यासह खान्देश आणि नाशिकपर्यंतचे रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. अशा रुग्णांची संख्या जवळपास एक हजारांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज महापालिकेच्या आरोग्य विभागातील सूत्रांनी व्यक्त केला. महापालिकेने खासगी रुग्णालयांना इतर जिल्ह्यांतील रुग्णांची आकडेवारी कळवावी, असे सांगितले होते. मात्र, आजपर्यंत एकाही रुग्णालयाने आकडेवारी दिलेली नाही.
५० ते ७५ हजार रुपये ॲडव्हान्स भरा
खासगी रुग्णालयांमध्ये काही विशिष्ट नागरिकांच्या माध्यमातून बेड मिळत आहेत. रुग्णास दाखल करण्यापूर्वी ५० ते ७५ हजार रुपये ॲडव्हान्स भरून घेतले जात आहेत. रुग्ण बरा होऊन घरी जाईपर्यंत संपूर्ण बिल किमान दोन लाखांपर्यंत जात आहे, हे विशेष!
प्रत्येक रुग्णाला पीपीई कीटचा खर्च
खासगी रुग्णालयात डॉक्टरने परिधान केलेल्या पीपीई कीटचा खर्च प्रत्येक रुग्णाच्या बिलात लावण्यात येत आहे. मागीलवर्षीही खासगी रुग्णालयांच्या या अनागोंदी कारभाराबाबत शासनाने गंभीर दखल घेतली होती. खासगी रुग्णालयांच्या बिल तपासणीसाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात आले होते.