corona virus in Aurangabad : मुंबईत कर्तव्य बजावून परतलेल्या एसटी वाहकाचा कोरोनामुळे मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 01:51 PM2021-04-27T13:51:08+5:302021-04-27T13:54:21+5:30
corona virus in Aurangabad : १० एप्रिल रोजी मुंबईत बेस्ट वाहतुकीसाठी गेले होते. कर्तव्य बजावून ते १८ एप्रिल रोजी औरंगाबादेत परतले.
औरंगाबाद : मुंबईतील बेस्ट वाहतुकीसाठी कर्तव्य बजावून परतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एसटी महामंडळाच्या वाहकाला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना या वाहकाचा दुर्दैवाने साेमवारी मृत्यू झाला.
शेकनाथ शंकर सिरसाठ (४९) असे मयत वाहकाचे नाव आहे. शेकनाथ सिरसाठ हे सिल्लोड आगारात कार्यरत होते. ते १० एप्रिल रोजी मुंबईत बेस्ट वाहतुकीसाठी गेले होते. कर्तव्य बजावून ते १८ एप्रिल रोजी औरंगाबादेत परतले. येथे आल्यानंतर १९ एप्रिल रोजी त्यांनी कोरोना तपासणी केली. २० एप्रिल रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. प्रारंभी ४ दिवस त्यांच्यावर सिल्लोड येथे उपचार करण्यात आले; परंतु प्रकृती बिघडल्याने त्यांना औरंगाबादेत एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांनी सोमवारी अखेरचा श्वास घेतला. प्रशासनाकडून सदर वाहकाच्या उपचारासाठी आवश्यक ती मदत करण्यात आली, अशी माहिती विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी दिली.
व्हेंटिलेटरची शोधाशोध
शेकनाथ सिरसाठ यांचे नातेवाईक विजय कळम म्हणाले, शहरात व्हेंटिलेटरची शोधाशोध केली; परंतु कुठेही ते उपलब्ध झाले नाही. ऑक्सिजन देऊन उपचार केले. अखेर त्यांना मृत्यूने गाठले. एसटी कर्मचाऱ्यांना मुंबईला पाठविले जात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा जीवाला धोका निर्माण होत आहे.
५० लाखांचा विमा कवच मिळावा
अन्य विभागातून मुंबईला चालक-वाहकांना पाठविणे बंद झाले आहे; परंतु औरंगाबादेतून कर्मचाऱ्यांना मुंबईला पाठविणे सुरूच आहे. हे बंद झाले पाहिजे. जे कर्मचारी कोरोनाने मृत्यू पावले, त्यांच्या नातेवाइकांना ५० लाखांचे विमा कवच दिले पाहिजे.
- बाबासाहेब साळुंके, विभागीय अध्यक्ष, एसटी कामगार संघटना