Corona Virus in Aurangabad : मेल्ट्रॉन रुग्णालयामध्ये ऑक्सिजनचे प्रेशर कमी; आठ रुग्णांना घाटीत हलविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 12:14 PM2021-05-14T12:14:44+5:302021-05-14T12:18:10+5:30
Corona Virus in Aurangabad : घाटी व खाजगी रुग्णालयात केले दाखल
औरंगाबाद : महापालिकेच्या मेल्ट्रॉन कोविड हॉस्पिटलमध्ये बुधवारी रात्री आठ रुग्ण गंभीर झाले होते. त्यांना घाटी आणि अन्य खासगी रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले. हॉस्पिटलमधील ऑक्सिजन प्रेशर कमी झाल्यामुळे आणि रुग्णांची परिस्थिती नाजूक असल्याने त्यांना तेथून हलविले, असे मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.
मेल्ट्रॉनच्या आयसीयूमध्ये १० तर ऑक्सिजनवर ६७ रुग्ण उपचार घेत होते. त्यांना दीड तासानंतर ऑक्सिजन सिलिंडर मिळाले. दरम्यानच्या काळात ऑक्सिजन कमी झाल्याने प्रशासनाची धाकधूक वाढली. त्यामुळे एकूण रुग्णांपैकी काहींना घाटीत, तर काही खासगीमध्ये दाखल झाले. रात्री साडेनऊ वाजता हा प्रकार घडला. रात्रीचे अकरा रुग्णांना हलविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. मेलट्रॉनमध्ये रुग्णांना दिवसभरात ६६७ आणि ८२ असा किमान आठशे लिटर ऑक्सिजन लागते. २५ सिलिंडर रात्री उशिरापर्यंत आल्यानंतर पुन्हा गुरुवारी सकाळी भरून घेण्यात आले. ऑक्सिजन सिलिंडरसह येथे ऑक्सिजन कोन्संट्रेशन उपलब्ध असल्याचे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.
ऑक्सिजनचे प्रेशर कमी होते
डॉ. पाडळकर यांनी सांगितले, रुग्ण गंभीर झाल्यास घाटीत हलविण्यात येतात. बुधवारी रात्री ऑक्सिजन प्रेशर कमी असल्याने रुग्ण अधिक गंभीर होऊ नयेत. म्हणून त्यांना तेथून हलविले. इतर रुग्णांना सुरळीत ऑक्सिजन मिळाला. ऑक्सिजनचे मुबलक सिलिंडर आहेत. सिलिंडर येण्यास वाहतुकीमुळे विलंब होतो.