corona virus : औरंगाबाद पालिकेची कमाल, शहरातील प्रत्येक दोन व्यक्तींमागे एकाची केली कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 11:33 AM2021-07-01T11:33:16+5:302021-07-01T11:37:18+5:30
corona virus : आरटीपीसीआर, ॲन्टिजन चाचण्यानंतर ९१ हजार पॉझिटिव्ह आढळले
औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून आजपर्यंत महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील अर्ध्याहून अधिक नागरिकांची कोरोना चाचणी केली आहे. तब्बल ८ लाख ५० हजार नागरिकांच्या आरटीपीसीआर, ॲन्टिजन चाचण्या केल्या गेल्या. त्यामध्ये ९१ हजार रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. ५ लाख ८९ हजार नागरिक निगेटिव्ह आढळले. २ लाख ६६ हजार २२४ नागरिकांचे रिपोर्ट अद्याप अप्राप्त आहेत. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेऊन महापालिकेने आणखी अडीच लाख तपासणी किटची खरेदी केली. ( Aurangabad Municipal Corporation did Corona test for every one person out of two in the city )
शहरात मार्च २०२० पासून कोरोना संसर्ग पसरू लागला. १५ मार्च २०२० ते १५ मार्च २०२१ या एक वर्षाच्या काळात महापालिकेच्या आरोग्य विभागाने रुग्ण शोधणे, तपासण्या, उपचार या त्रिसूत्रीवर भर दिला होता. वर्षभरात ४ लाख ५० हजार कोरोना टेस्ट केल्या. यात आरटीपीसीआरपेक्षा अॅन्टिजन टेस्टचे प्रमाण अधिक आहे. जानेवारी २०२१ अखेरपर्यंत शहरात कोरोनाची पहिली लाट ओसरली होती. त्यावेळी शहरात दररोज केवळ १० ते १५ बाधित आढळत होते. मात्र, फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शहरात शिरकाव केला आणि मार्च महिन्यापासून या लाटेने उग्र रूप धारण केले. दररोज १ हजारपेक्षा अधिक रुग्ण आढळत होते. त्यामुळे मनपा प्रशासनाने टेस्टची गती वाढवली. मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांत दररोज ४ ते ५ हजार आरटीपीसीआर व अॅन्टिजन टेस्ट केल्या. यातून अधिकाधिक रुग्णांना शोधून बाधितांना वेळीच उपचारासाठी दाखल करण्यात आले. यामुळे मे महिन्यापासून शहरातील रुग्णांची संख्या कमी होण्यास सुरुवात झाली. ती आता जून महिन्यात दुसरी लाट ओसरल्यात जमा झाली आहे. मागील चार महिन्यांत साडेतीन लाख कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत.
योग्य वेळी उचित निर्णय
शहरात रुग्ण शोधण्यासाठी मोबाइल टीम तैनात करण्यात आली. शहरात बाहेरगावहून येणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्यासाठी एन्ट्री पॉइंटवर तसेच विमानतळ, रेल्वेस्टेशन येथे तपासण्या सुरू करण्यात आल्या. तपासणीत पॉझिटिव्ह आलेल्या नागरिकांना थेट कोविड केअर सेंटरमध्ये पाठविण्यात येत होते. त्यामुळे संसर्गाला ब्रेक लागला.
कोरोना तपासण्यांचा आलेख
- एकूण तपासण्या : ८,५५,६०१
- निगेटिव्ह : ५,८९,३७७
- पॉझिटिव्ह : ९१,१२४
-रिपोर्ट अप्राप्त : २,६६,२२४
- बाहेरील पॉझिटिव्ह : ४,१३५
- शहरातील पॉझिटिव्ह : ८६,९८९