corona virus : दिलासा ! औरंगाबाद महापालिकेने दिली १० हजार रेमडेसिविरची ऑर्डर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 02:06 PM2021-04-24T14:06:35+5:302021-04-24T14:11:28+5:30
corona virus शहरात इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर घाटी रुग्णालयासह इतर ठिकाणी महापालिकेने इंजेक्शन दिले.
औरंगाबाद : कोरोना संसर्गामुळे रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. औरंगाबाद शहरात मात्र इंजेक्शनचा मुबलक साठा होता; पण आता हे इंजेक्शन संपल्यामुळे आणखी १० हजार इंजेक्शन मागविण्यात आल्याचे महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले.
महापालिकेच्या मेल्ट्रॉन येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल गंभीर रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन दिले जाते. त्यामुळे यापूर्वीच महापालिकेने १० हजार इंजेक्शन खरेदी केले होते; पण शहरात इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर घाटी रुग्णालयासह इतर ठिकाणी महापालिकेने इंजेक्शन दिले. आता महापालिकेकडील साठा संपत आल्याने आणखी १० हजार इंजेक्शनची मागणी करण्यात आली आहे. त्यातील आवश्यक साठा लवकरच मिळेल, तसेच जिल्हा प्रशासनानेदेखील १५ हजार इंजेक्शनची मागणी केली आहे.
दिवसभरात ६ हजार नागरिकांची कोरोना तपासणी
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शुक्रवारी शहरात ६ हजार २६ नागरिकांची तपासणी करण्यात आली. अँटिजन पद्धतीने ३ हजार ५१७ जणांची टेस्ट केली. त्यात १३३ जण पॉझिटिव्ह आढळून आले. २ हजार ५०९ नागरिकांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले. त्याचा अहवाल महापालिकेला शनिवारी सकाळी प्राप्त होईल.