Corona Virus: काळजी घ्या! कोरोनाची पुन्हा येतेय सत्ता, नव्या रुग्णांचे अर्धशतक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 12:09 PM2022-07-04T12:09:49+5:302022-07-04T12:10:20+5:30
Corona Virus: सक्रिय रुग्ण दोनशेपार; शहराचा पाॅझिटीव्हिटी रेट १७.७५ टक्क्यांवर
औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाचा विळखा वाढत असून, रविवारी दिवसभरात ५३ नव्या रुग्णांची वाढ झाली. यात सर्वाधिक ४१ रुग्ण हे शहरातील आहेत. तर ग्रामीण भागात १२ रुग्णांचे निदान झाले. जिल्ह्यातील सक्रिय म्हणजे उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही दोनशेपार गेली आहे. यामध्ये शहरातील रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेकडून चिंता व्यक्त होत आहे.
जूनच्या प्रारंभीपासून कोरोनाचा आलेख पुन्हा एकदा वाढण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात ५ जून रोजी अवघ्या ७ रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यानंतर दररोज निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. सध्या २०८ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहे. तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव ओसरल्याच्या तीन महिन्यांनंतर रविवारी प्रथमच नव्या रुग्णांची संख्या पन्नाशीपार गेली. चिंतादायक म्हणजे ग्रामीण भागाच्या तुलनेत सध्या शहरात निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. औरंगाबाद शहरात मागील आठवडाभरापासून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढत आहे.
रविवारी तब्बल ४१ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले. यामुळे शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या १६३ झाली आहे. चिंतादायक म्हणजे, रविवारी शहराचा पॉझिटीव्हिटी रेट १७.७५ टक्के एवढा नोंदवला गेला. ग्रामीण भागातील ४५ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सोशल डिस्टन्सचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आले आहे.