corona virus : औरंगाबादकरांना मोठा दिलासा; कोरोनाबाधीत प्राध्यापिकेच्या घरातील व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 03:46 PM2020-03-20T15:46:19+5:302020-03-20T15:50:27+5:30
यामुळे शहरवासियांना मोठा दिलासा मिळाला असून शहर कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यापासून दूर असल्याची पुष्टी मिळाली आहे.
औरंगाबाद : शहरातील एका खाजगी रुग्णालयात रशिया येथून परतलेल्या प्राध्यापिकेवर कोरोनाची लागण झाल्याने उपचार सुरु आहेत. उपचारासाठी दाखल केल्यानंतर त्यांच्या जवळच्या संपर्कातील व्यक्तींच्या कोरोनाच्या चाचण्या घेण्यात आल्या. यात सोबतच्या एका प्राध्यापिकेचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांची सासू, वाहनचालक आणि कुक यांचा अहवाल सुद्धा आज निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस.व्ही.कुलकर्णी यांनी दिली आहे. यामुळे शहरवासियांना मोठा दिलासा मिळाला असून शहर कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यापासून दूर असल्याची पुष्टी मिळाली आहे.
कोरोनाची लागण झालेलीं प्राध्यापिका रशिया येथून दिल्लीमार्गे शहरात आल्यानंतर काही दिवसांनी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला होता. त्यानंतर प्राध्यापिकेचा वावर असलेल्या ठिकाणी आरोग्य पथकाने युद्ध पातळीवर सर्वक्षण केले होते. यावेळी त्यांच्या जवळच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी करण्यात आली. यात त्यांच्या घरातील सासू, वाहनचालक, स्वयंपाकी यांचा अहवाल आज निगेटिव्ह आला. यापूर्वी त्यांच्या जवळच्या एका प्राध्यापिकेचा अहवाल सुद्धा निगेटिव्ह आला होता. प्राध्यापिकेच्या जवळच्या व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आल्याने शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे .तसेच वैद्यकीय तज्ञांनी शहर कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यापासून दूर असल्याचे मत व्यक्त केले आहे.
प्राध्यापिकेचा अहवाल २ दिवसांत येणार
खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या प्राध्यापिकेची प्रकृती स्थिर आहे. या प्राध्यापिकेचे गेल्या २४ तासांत २ स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल २ दिवसांत मिळण्याची शक्यता आहे, असे खाजगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले. हे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्यास रुग्णालयातून सुटी देण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असेही सांगण्यात आले. औषधोपचारामुळे रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यामुळे हे अहवाल निगेटिव्ह येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.