corona virus : कोविड सेंटरचे ऑक्सिजन सिलिंडर रोखले; निवासी इमारतीत सेंटर सुरू केल्याने रहिवाशी संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 12:39 PM2021-04-27T12:39:31+5:302021-04-27T12:41:53+5:30
corona virus : या पार्श्वभूमीवर डॉ. उदयसिंग राजपूत यांनी पुंडलिकनगर रस्त्यावरील दुर्गानंद हाईट्स या इमारतीत सुभाश्री हॉस्पिटल आणि कोविड सेंटर सुरू केले आहे.
औरंगाबाद : निवासी इमारतीत कोविड सेंटर सुरू केल्यामुळे संतप्त रहिवाशांनी त्या इमारतीची लिफ्टच बंद केली. यामुळे गंभीर रुग्णांसाठी आणलेले ऑक्सिजन सिलिंडर वरच्या मजल्यावर पोहोचविणे शक्य होत नव्हते. हा प्रकार पाहून रुग्णांचे नातेवाईक संतप्त झाले. या घटनेची माहिती मिळताच पुंडलिकनगर पोलिसांनी तिकडे धाव घेऊन उभयतांची समजूत काढली व लिफ्ट सुरू करून सिलिंडर वरती नेणे शक्य झाले.
औरंगाबाद शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शिवाय शेजारील विविध जिल्ह्यांचे रुग्णही उपचारासाठी शहराकडे धाव घेत आहेत. परिणामी, शहरातील रुग्णालये फुल्ल झाली आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. उदयसिंग राजपूत यांनी पुंडलिकनगर रस्त्यावरील दुर्गानंद हाईट्स या इमारतीत सुभाश्री हॉस्पिटल आणि कोविड सेंटर सुरू केले असून, तेथील ‘आयसीयू’मध्ये सध्या १२ रुग्ण कोविड पॉझिटिव्हचे उपचार घेत आहेत.
या इमारतीमधील १४ फ्लॅटधारकांनी आज सकाळी थेट उद्वाहकच (लिफ्ट) बंद केले. ही बाब डॉ. राजपूत यांना समजल्यावर त्यांनी लिफ्ट सुरू करण्याची रहिवाशांकडे वारंवार विनंती केली. मात्र, ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. शिवाय वरच्या मजल्यावरील ‘आयसीयू’मध्ये दाखल १२ रुग्णांचा ऑक्सिजन संपत आला होता. ऑक्सिजन सिलिंडर तातडीने वरच्या मजल्यावरील ‘आयसीयू’मध्ये नेणे गरजेचे होते. मात्र, लिफ्ट बंद असल्यामुळे ते तातडीने वर पोहोचवणे शक्य नव्हते. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक संतप्त झाले होते. शेवटी डॉक्टरांनी थेट पुंडलिकनगर पोलीस ठाणे गाठून हा प्रकार पोलिसांना सांगितला. सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, फौजदार व्ही.जी. घोडके आणि अन्य पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी रुग्णांचा जीव महत्त्वाचा आहे, असे सांगून रहिवाशांची समजूत काढली. त्यानंतर लिफ्ट चालू करण्यात आली व ऑक्सिजन सिलिंडर ‘आयसीयू’मध्ये नेणे शक्य झाले.
लहान मुले- वृद्धांना संसर्ग होण्याची भीती
निवासी इमारतीत कोविड सेंटर सुरू झाल्यापासून तेथील रहिवाशांची चिंता वाढली आहे. रुग्णांचे नातेवाईक व्हरांड्यात आणि पायऱ्यावर, पोर्चमध्ये झोपतात. त्यांच्यामुळे आपल्या घरातील लहान मुले, वृद्धांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका असल्याचा आरोप करीत रहिवाशांनी या कोविड सेंटरवरच आक्षेप घेतला आहे. निवासी भागात या सेंटरला परवानगी मिळालीच कशी, असा सवाल त्यांनी उपस्थित करीत तेथील संतप्त रहिवाशांनी इमारतीची लिफ्ट बंद करून ठेवली.