कोरोना आला, ‘लस देता का लस’, पण कोविशिल्ड, कोर्बेव्हॅक्सचा ठणठणाट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 06:40 PM2022-12-26T18:40:21+5:302022-12-26T18:40:44+5:30
आधी पाठ, आता मागणी : ५० हजार कोवॅक्सिन डोस होणार ५ दिवसांत मुदतबाह्य
औरंगाबाद : चीनमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाची चर्चा सुरू झाली आणि ‘लस देता का लस’ म्हणत नागरिक आरोग्य केंद्रांकडे धाव घेत आहे. मात्र, जिल्ह्यात कोविशिल्ड, कोर्बेव्हॅक्स ठणठणाट असून, एकही लस उपलब्ध नसल्याची परिस्थिती आहे तर आगामी ५ दिवसांत ५० हजार कोवॅक्सिन डोस मुदतबाह्य होणार असल्याची परिस्थिती आहे.
कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर मार्चपासून जनजीवन पूर्वपदावर आले. त्यामुळे कोरोनाची लसीकडे नागरिकांनी पाठ फिरविली. अनेकांनी दुसरा डोस, बुस्टर घेण्याचे टाळले. चीनमध्ये कोरोनाचा कहर सुरू असताना या विषाणूचा बीएफ ७ (बीए ५.२.१.७) हा नवा अवतार सापडला आहे. त्यामुळे देशभरात खबरदारी घेण्यास सुरुवात करण्यात आली. राज्यातही आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. या सगळ्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून लसीची मागणी करण्याचे प्रमाण वाढत आहे. कोवॅक्सिन लस सहजपणे मिळत आहे. परंतु, कोविशिल्ड, कोर्बेव्हॅक्सची एकही लस उपलब्ध नाही. जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. सुधाकर शेळके म्हणाले, ३१ डिसेंबरला कोवॅक्सिन साठा मुदतबाह्य होणार आहे. या लसीचा डोस घेण्यासाठी जे पात्र आहेत, त्यांनी त्याचा डोस घ्यावा.
लसींची मागणी केली
मध्यंतरी नागरिकांनी लसीकडे पाठ फिरविली. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असतानाही ४१ ठिकाणी कोरोना चाचणीची सुविधा दिली आणि आताही देत आहोत. नागरिक कोरोनाला विसरले होते, परंतु, मनपाची आरोग्य यंत्रणा कार्यरत होती. नागरिकांकडून लसीची मागणी होत आहे. शासनाकडे कोविशिल्ड, कोर्बेव्हॅक्स लसीची मागणी करण्यात आली आहे.
- डाॅ. पारस मंडलेचा, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा