नागरिक हो... हात जोडून विनंती; औरंगाबादचे अकोला, यवतमाळ, अमरावती होऊ देऊ नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 12:02 PM2021-02-24T12:02:21+5:302021-02-24T12:05:13+5:30
corona virus in Aurangabad कोणताही व्हायरस हा काही काळानंतर स्वरूप बदलत असतो. सध्या कोणता स्ट्रेन आहे, हे अद्याप समोर आलेले नाही.
औरंगाबाद : कोरोनाची जी लढाई जिंकत आलो होतो, ती लढाई थोडक्यात हरण्याची भीती आहे. पण अजूनही वेळ गेलेली नाही. हात जोडून विनंती आहे, औरंगाबादचे अकोला, यवतमाळ, अमरावती होऊ देऊ नका. उपचाराची वेळ येण्यापेक्षा मास्क, सॅनिटायझर वापरा, गर्दी टाळा, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी औरंगाबादकरांना केले.
घाटीत मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. येळीकर यांनी संवाद साधला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे, मेडिसिन विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, डॉ. जगन्नाथ दीक्षित, वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. प्रीती बिराजदार यांची यावेळी उपस्थिती होती. डॉ. येळीकर म्हणाल्या, घाटी रुग्णालय उपचारासाठी सज्ज आहे. पण उपचार घेण्याची वेळच येणार नाही, यासाठी नागरिकांनी जबाबदारीने वागण्याची गरज आहे. गेल्या वर्षभरात कोरोनामुळे अनेकांचे प्राण गेले. पण योग्य खबरदारी घेऊन जबाबदारीने वागले असते, तर कदाचित या लोकांचे प्राण वाचले असते. डॉ. भट्टाचार्य म्हणाल्या, सर्दी, खोकला, ताप असेल तर हे दुखणे अंगावर काढता कामा नये. कोरोनाला १०० टक्के प्रतिबंध करता येतो. त्यासाठी मास्कचा वापर महत्त्वपूर्ण आहे.
व्हायरस बदलतात स्वरूप
कोणताही व्हायरस हा काही काळानंतर स्वरूप बदलत असतो. सध्या कोणता स्ट्रेन आहे, हे अद्याप समोर आलेले नाही. सध्या कोरोनाची लक्षणे पूर्वीची जी आहेत, तीच आहेत. एकापासून दुसऱ्याला संसर्ग होण्याचे प्रमाण काय आहे, हे आगामी काही दिवसात स्पष्ट होईल, असे डॉ. येळीकर यांनी सांगितले.