corona virus : शहरातील सर्व मॉल बंद; पण जीवनावश्यक वस्तू विक्रीला मुभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 11:59 AM2020-03-16T11:59:08+5:302020-03-16T12:01:21+5:30

नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने उचलली पावले 

corona virus: closed all malls in town; But the sale of essential goods is allowed | corona virus : शहरातील सर्व मॉल बंद; पण जीवनावश्यक वस्तू विक्रीला मुभा

corona virus : शहरातील सर्व मॉल बंद; पण जीवनावश्यक वस्तू विक्रीला मुभा

googlenewsNext
ठळक मुद्देरविवार दुपारपर्यंत शहरात जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतीही नोटीस बजावली नव्हती.दररोज अडीच ते तीन कोटींचा फटका२४ स्क्रीनवरील १२० शो रद्द : १३ चित्रपटगृहे बंद

औरंगाबाद : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने शहरातील मॉल्स तात्पुरते बंद ठेवण्याचे आदेश दिले. दुपारनंतर आदेश प्राप्त होताच प्रोझोनसह सर्व ६ मॉलमधील ग्राहकोपयोगी वस्तूंचे दालन बंद करण्यात आले. फक्त ज्या मॉलमध्ये जीवनावश्यक वस्तू व औषधींची दुकाने आहेत तीच दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

राज्य शासनाने राज्यातील मॉल बंद करण्याचे आदेश दिले असले तरी शहरात जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतीही नोटीस बजावली नव्हती. यामुळे शहरातील सर्व मॉल रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे सुरू होते. मात्र, कोरोनाची लागण झालेली एक महिला रुग्ण खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली आणि संपूर्ण प्रशासन खडबडून जागे झाले. जिल्हाधिकाऱ्यांनी दुपारी अडीच ते तीन वाजेदरम्यान शहरातील ६ मॉल्स बंद करण्याबाबतची नोटीस पाठविली. मॉलमधील जीवनावश्यक वस्तू व औषधीचे दालन वगळता अन्य दालने बंद करण्याचे आदेशात नमूद केले होते. याची त्वरित अंमलबजावणी प्रोझोन मॉलने केली. सर्व दालने बंद केली व फक्त येथील जीवनावश्यक वस्तूंचे दालन सुरू ठेवले, तसेच गजानन मंदिर रोडवरील रिलायन्स मॉल, शहानूरमियाँ दर्गा येथील डी मार्ट, हडकोतील डी मार्ट, पैठण रोडवरील वॉलमार्ट येथेही अन्य दालन बंद करण्यात आले होते. नागरिकांना फक्त पालेभाज्या, फळे अन्य जीवनावश्यक वस्तूंची विक्री केली जात होती. 

जालना रोडवरील रिलायन्स स्मार्ट सुरू होते. येथे जीवनावश्यक वस्तू विक्री केली जात होती. विशेष म्हणजे याच इमारतीत तळमजल्यावर असलेल्या ब्रँड फॅक्टरीला सायंकाळी ६ ते ६.३० वाजेदरम्यान प्रशासनाने नोटीस दिली. त्यानंतर हा मॉल बंद करण्यात आला. ३१ मार्चपर्यंत मॉल बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. यासंदर्भात प्रोझोनचे वरिष्ठ उपाध्यक्ष व केंद्र संचालक कमल सोनी यांनी सांगितले की, जीवनावश्यक वस्तू व औषधींचे दालन वगळता १५ दिवस मॉलची अन्य दालने बंद राहणार आहेत. कोट्यवधींचे नुकसान होणार आहे; पण  नुकसानीपेक्षा ग्राहकांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. आम्ही जिल्हा प्रशासनासोबत आहोत, अशी प्रतिक्रिया मॉल प्रतिनिधींनी दिली.

दररोज अडीच ते तीन कोटींचा फटका
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील ७ मॉल्स तात्पुरते बंद ठेवण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाने दिला. यामुळे सर्व मॉल्स मिळून दररोज अडीच ते तीन कोटींची उलाढाल ठप्प राहणार असल्याचे मॉलच्या प्रतिनिधींनी सांगितले. 

रविवारच्या आठवडी बाजारात सायंकाळी गर्दी
कोरोना व्हायरसच्या भीतीची प्रचीती आज रविवारच्या जाफरगेटमध्ये भरणाऱ्या आठवडी बाजारात दिसून आली. दिवसभर येथील भाजीपाला, फळ विक्रेते ग्राहकांच्या प्रतीक्षेत बसून होते. मात्र, जिल्हा प्रशासनाने मॉल, थिएटर बंद करण्याचे आदेश दिले. तसेच भाजीमंडी बंद राहते की काय, या भीतीने आठवडाभराच्या भाज्या खरेदीसाठी सायंकाळी ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडाली होती. दर रविवारी जुना मोंढा परिसरातील जाफरगेट येथे आठवडीबाजार भरविण्यात येतो. गांधीनगरच्या बाजूने पालेभाज्या, फळ विक्रेते बसत असतात, तर जाफरगेटच्या बाजूने कपडे, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल्स, हार्डवेअर विक्रेते बसतात. पालेभाजी विक्रेते जे सकाळी ८ वाजता येऊन बसत ते आज १० वाजेनंतर आले. दुपारी १२ वाजता पालेभाज्यांचा निम्मा बाजार भरला होता. त्यात ग्राहकांनी पाठ फिरविली. दुपारी २ वाजेपर्यंत अनेकांची बोहणी झाली नव्हती, मात्र, दुपारनंतर जिल्हा प्रशासनाने शहरातील मॉल व थिएटर बंद ठेवण्याचे आदेश दिले आणि त्याची बातमी सर्वत्र पसरली. भाजीमंडी बंद राहील की काय, या भीतीने अनेक ग्राहकांनी सायंकाळी आठवडीबाजार गाठला व पुढील आठवडाभराचा भाजीपाला खरेदी करू लागले. एकदम गर्दी उसळली होती. मात्र, पथदिव्यांची व्यवस्था नसल्याने अनेकांनी मोबाईल बॅटरीच्या उजेडात भाज्या विकल्या. 

२४ स्क्रीनवरील १२० शो रद्द : १३ चित्रपटगृहे बंद
कोरोना व्हायरसचे संक्रमण होऊ नये यासाठी खबरदारी घेत जिल्हा प्रशासनाने शहरातील १३ चित्रपटगृहे ३१ मार्चपर्यंत बंद ठेवली आहेत. शहरात आजघडीला १३ चित्रपटगृहे सुरू आहेत. यात सर्व मिळून २४ पडदे (स्क्रीन) आहेत.  प्रत्येक स्क्रीनमध्ये दररोज ५ शो दाखविण्यात येतात. असे १२० शो रद्द झाले आहेत. यामुळे दररोजची सुमारे २० ते २२ कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. चित्रपटगृहांमध्ये सिनेमा पाहण्यासाठी रविवारी सर्वाधिक गर्दी असते. नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी टॉकीजमध्ये पहिला शो दाखविण्यात आला. मात्र, नंतर जिल्हा प्रशासनाची नोटीस मिळताच सर्व चित्रपटगृहांमध्ये तिकीट विक्री बंद करण्यात आली. नंतरचे सर्व शो रद्द करण्यात आले, तसेच चित्रपटगृहाचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले. प्रवेशद्वारावर जिल्हा प्रशासनाने दिलेली नोटीस चिकटविण्यात आली होती. चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांनी सांगितले की, ज्या ग्राहकांनी चित्रपटगृहावर येऊन अ‍ॅडव्हॉन्स बुकिंग केली आहे त्यांना तिकिटाची रक्कम परत करण्यात येत आहे. ज्यांनी आॅनलाईन बुकिंग केली त्यांना आॅनलाईन रिफंड मिळतो. शहरातील सुरू असलेली चार नाट्यगृहेही १५ दिवसांसाठी बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे या नाट्यगृहातील विविध नाटके आणि इतर कार्यक्रम होणार नाहीत. शहरात आगामी काळात मंगलकार्यालयात होणाऱ्या लग्नसोहळ्यांबाबत मात्र प्रशासनाने अजून काही निर्णय घेतला नाही. 

Web Title: corona virus: closed all malls in town; But the sale of essential goods is allowed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.