corona virus : औरंगाबादेत कोरोनाचा शिरकाव; प्राध्यापक महिलेचा कोरोना अहवाल ‘पॉझिटिव्ह’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 12:21 PM2020-03-16T12:21:51+5:302020-03-16T12:27:04+5:30
आरोग्य यंत्रणा हाय अलर्ट झाली असून, शहरात खबरदारीच्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या .
औरंगाबाद : राज्यातील मुंबई, पुणे, नागपूरपाठोपाठ औरंगाबादेतही कोरोना विषाणूचा शिरकाव झाला आहे. खाजगी रुग्णालयात दाखल झालेल्या ५९ वर्षीय महिलेचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा हाय अलर्ट झाली असून, शहरात खबरदारीच्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या .
खाजगी रुग्णालयात दाखल ही महिला शहरातील एका शैक्षणिक संस्थेत प्राध्यापक आहे. शहरातून दि.२३ फेब्रुवारी रोजी त्या रशिया, कझाकिस्तान येथे गेल्या. तेथून त्या दि.३ मार्चला शहरात परतल्या. प्रकृतीत बिघाड झाल्याने त्या दि.१३ मार्च रोजी खाजगी रुग्णालयात दाखल झाल्या. त्यांची लक्षणे आणि प्रवासाच्या माहितीवरून कोरोना संशयित म्हणून आरोग्य विभागाने नोंद घेऊन त्यांचा स्वॅब तपासणीसाठी पुण्याला पाठविला होता. त्याचा अहवाल रविवारी प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेत एकच खळबळ उडाली.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते, साथरोग अधिकारी डॉ. एस. एन. बारटकर, मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी रुग्णालयात धाव घेतली व रुग्णाच्या प्रकृतीचा आढावा घेतला. महिलेची प्रकृती स्थिर असून, ती संवादही साधते. श्वासोच्छ्वास घेण्यास त्यांना कोणताही त्रास होत नाही. खाजगी रुग्णालयातच पुढील उपचार सुरू राहणार असल्याचे डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांनी सांगितले.
‘एआरटी’ उपचार सुरू
या महिलेवर १० खाटांच्या आयसोलेशन कक्षात उपचार सुरू आहे. हा वॉर्ड रुग्णालयातील इतर वॉर्डांपासून दूर आहे. या महिलेवर अॅन्टी रिट्रो व्हायरल थेरपी (एआरटी) उपचार करण्यात येत आहे. यात तीन प्रकारची औषधी, मलेरियाचे औषधोपचार सुरू आहेत. उपचाराच्या ४ दिवसांनी महिलेचा ‘स्वॅब’ पुन्हा एकदा तपासणीसाठी पाठविला जाणार आहे.
प्रत्येक जण मास्क घालून
ज्या खाजगी रुग्णालयात महिलेवर उपचार सुरू आहे, तेथे प्रत्येक जण मास्क घालून वावरताना दिसून आला. आरोग्य अधिकारीही मास्क घालूनच होते. रुग्णालयात विनाकारण प्रवेश करणाऱ्यांना रोखण्यातही येत होते.
१२ खाजगी रुग्णालयांत १०३ खाटा, मनपाची प्रतीक्षाच
शहरात जिल्हा रुग्णालयात आणि घाटी रुग्णालयात कोरोना संशयित रुग्णांवरील उपचारासाठी स्वतंत्र विभाग, खाटा आरक्षित करण्यात आल्या आहेत. तसेच १२ खाजगी रुग्णालयांत १०३ खाटाही सज्ज आहेत. महापालिकेने स्वत:चा अद्यापही कोणता कक्ष, खाटा आरक्षित केलेल्या नाहीत. ३० खाटा उपलब्ध के ल्या जाणार असल्याचे महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.
‘डेंग्यू’ प्रमाणे हलगर्जीपणा नको
शहरात पावसाळ्यात डेंग्यूचा एकच उद्रेक झाला होता. जवळपास १२ जणांचा त्या बळी गेला होता. डेंग्यू नियंत्रणात आणण्यात महापालिका आणि आरोग्य यंत्रणा अपयशी ठरली होती. कोरोना विषाणूच्या नियंत्रणात कोणताही हलगर्जीपणा होणार नाही, अशी अपेक्षा सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे. कोरोना रोखण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याची ग्वाही मपना आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.