Corona Virus : नियम तोडणाऱ्यांना दणका; पैठणमध्ये मोंढ्यातील दहा व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 12:42 PM2021-05-20T12:42:43+5:302021-05-20T12:43:59+5:30
Corona Virus : कोरोना नियमांचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही असा इशारा पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी दिला आहे.
पैठण : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करण्यात आल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सुरू असलेल्या कांदा मार्केटवर पोलीस व नगर परिषदेच्या संयुक्त पथकाने बुधवारी कारवाई केली. यावेळी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० व्यापाऱ्यांवर पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही असा इशारा पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी दिला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू असून कडक नियमांवली लागू आहे. यानुसार जीवनावश्यक सेवांसाठी दुकाने ७ ते ११ या मर्यादित कालावधीत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. परंतु, काही व्यापारी व दुकानदार वेळेची मर्यादा न पाळता सर्रासपणे दिवसभर दुकाने सुरू ठेवत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे खरेदीसाठी नागरीक घराबाहेर पडत असल्याने कडक नियमांच्या उद्देशास हरताळ फासला जात होते.
बुधवारी दुपारी पोलीस व नगर परिषदेचे पथक नियमांच्या अंमलबजावणीसाठी गस्त घालत होते. यावेळी बाजार समितीच्या मोंढ्यात कांदा मार्केट सुरू असून तेथे मोठ्या संख्येने ग्राहकाची गर्दी झाल्याचे धक्कादायक चित्र पथकास आढळून आले. पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी मोंढ्यातील सर्व व्यापाऱ्यांनी कोरोना नियम पाळून सहकार्य करावे असे आवाहन केले. यानंतर नियमांचे उल्लंघन करून दुकाने सुरू ठेवणाऱ्या शुभम विलास काला, हमीद बाबामियाँ बागवान, नाथा रामकीसन ढाकणे, सलीम अकबर बागवान , शेहराज करीम बागवान , महादेव रामकीसन ढाकणे, राहुल प्रमोदकुमार पाटणी, केदारनाथ दादाराव सर्जे यांच्यासह कोर्ट रोडवरील साई टायर या दुकानदारांविरोधात पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गोपाळ पाटील, मुकुंद नाईक, मनोज वैद्य , अरुण जाधव , कल्याण ढाकणे , समादेशक राजू कोटलवार आदींचा सहभाग होता.