CoronaVirus : औरंगाबादला १४ तारखेपर्यंत धोका; रुग्णसंख्या १३०० पर्यंत जाण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 09:23 AM2020-05-05T09:23:18+5:302020-05-05T09:24:44+5:30
१० दिवसांत रुग्णसंख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता
औरंगाबाद : शहरातील कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होण्याची भीती आहे. आगामी १४ मे पर्यंत रुग्णसंख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आरोग्य यंत्रणेकडून वर्तविण्यात आली आहे. शहरातील रुग्णसंख्या १३०० पर्यंत जाऊ शकते, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी म्हणाले.
यापूर्वी आरोग्य यंत्रणेने २९ एप्रिल रोजी रुग्णसंख्येत मोठी वाढ होण्याचा इशारा दिला होता. गेल्या काही दिवसांत शहरात मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्णांचे निदान झाले. दररोज कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना शहरासाठी आणखी एक धोक्याची घंटा वाजली आहे. शहरात १९ एप्रिलपासून दररोज पॉझिटिव्ह रुग्णांचे निदान होत आहे. त्यात गेल्या १६ दिवसांत एकही दिवस खंड पडलेला नाही. शहरात २७ एप्रिल ते ३ मे दरम्यान रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यात गेल्या ८ दिवसांत दररोज २० पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले. आता ५ ते १४ मे दरम्यान रुग्णसंख्या आणखी झपाटयाने वाढण्याची भीती आहे.
या कालावधीत शहरातील रुग्णसंख्या १३०० च्या घरात जाऊ शकते, असा अंदाज आरोग्य यंत्रणेकडून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काही दिवस शहरासाठी चिंतदायक ठरण्याची भीती आहे. 'क्लोज काँटॅक्ट'मुळेच रुग्णांत वाढ शहरात पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा दररोज वाढत आहे. मात्र, आद्यपही समूह संसर्ग नाहीच, असा दावा केला जात आहे. 'क्लोज काँटॅक्ट'मुळेच रुग्णांचा आकडा वाढत असल्याचे आरोग्य यंत्रणेचे म्हणणे आहे.
आणखी एक हजार रुग्ण ?
शहरात सध्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३०० च्या पुढे आहे. त्यामुळे आणखी १ हजार रुग्ण वाढण्याची भीती आहे. या कालावधीत नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आणि रुग्णांच्या संपर्कातील लोकांना बाधा झाल्याचे निदान होण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. अशी आहे उपचाराची परिस्थिती शहरात २ हजार रुग्णांवर उपचाराची तयारी मनपाने केलेली आहे. तर घाटीत ४५० रुग्णांच्या उपचाराची सुविधा होऊ शकते, असे मनपाचे म्हणणे आहे. परंतु सध्या २०८ रुग्णांवर उपचाराची यंत्रणा घाटीत सज्ज आहे. यातही केवळ ४८ गंभीर रुग्णांवर उपचार शक्य आहे. जिल्हा रुग्णालयात २०० खाटा आहे. प्रत्यक्षात सध्या १३० रुग्णांवर उपचाराची सुविधा आहे. येथील सुविधा वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.
'डब्लूएचओ'चा इशारा
जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ)१४ मे पर्यंत रुग्णसंख्या वाढू शकते, असा इशारा दिला आहे. त्यानुसार शहरात १३०० पर्यंत रुग्णसंख्या जाऊ शकते. उपचाराच्या दृष्टीने मनपा, घाटी आणि आमच्याकडून नियोजन करण्यात आलेले आहे. - डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक