Corona Virus: महामारीत जन्माला आलेली कोरोना गर्ल करिना आठवते का? कोविडमधील राज्यातील पहिल्या सीझर प्रसूतीला ३ वर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 08:52 AM2023-04-19T08:52:55+5:302023-04-19T08:53:42+5:30
Corona Virus: राज्यासह देशभरात चर्चा झालेली कोरोना गर्ल ‘करिना’ आठवते का? छत्रपती संभाजीनगरमध्ये ३ वर्षांपूर्वी कोरोनाबाधित महिलेची जिल्हा रुग्णालयात सिझेरियन प्रसूती झाली होती.
छत्रपती संभाजीनगर : राज्यासह देशभरात चर्चा झालेली कोरोना गर्ल ‘करिना’ आठवते का? छत्रपती संभाजीनगरमध्ये ३ वर्षांपूर्वी कोरोनाबाधित महिलेची जिल्हा रुग्णालयात सिझेरियन प्रसूती झाली होती. जन्मानंतर २५ दिवस ही चिमुकली आईपासून दूर होती. तेव्हा व्हिडीओ काॅलिंगवरूनच मायलेकी एकमेकीस पाहत होत्या. हीच ती कोरोना गर्ल...करिना. मातृत्वापुढे हरलेल्या कोरोनाच्या या घटनेला मंगळवारी ३ वर्षे पूर्ण झाली.
जाेगेश्वरी पश्चिममधून संभाजीनगरात आलेल्या कोरोनाबाधित महिलेची जिल्हा सामान्य रुग्णालयात १८ एप्रिल २०२० रोजी सिझेरियन प्रसूती झाली. महिलेने मुलीला जन्म दिला. कोरोना प्रादुर्भावात अशा प्रकारची देशातील दुसरी आणि महाराष्ट्रातील पहिलीच प्रसूती ठरली. मुलीला कोरोना होऊ नये, म्हणून तिला आईपासून दूर ठेवले होते. तेव्हा ‘लोकमत’ प्रतिनिधीने सुचविलेल्या कल्पनेनंतर मायलेकीची व्हिडीओ काॅलिंगद्वारे भेट घडविण्यात आली.
डॉक्टरांनी ठेवले नाव
- जन्मानंतर काही तासांतच करिनाचा व्हिडीओ काॅलिंगद्वारे मोबाईलशी संबंध जोडला गेला. आता ती आईच्या मदतीने स्वत:चे रिल्सही तयार करीत आहे.
- तेव्हा रुग्णालयातून घरी परतताना डाॅक्टर, परिचारिकांनी या कोरोना गर्लचे नाव ‘करिना’ असे ठेवले होते.