Corona Virus : औरंगाबादमध्ये पूर्वीचेच निर्बंध कायम; कोरोनाबाधितांची संख्या कमी असली तरी टेस्टिंग वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 05:56 PM2021-07-16T17:56:26+5:302021-07-16T17:59:27+5:30
Corona Virus in Aurangabad : जिल्ह्यातील कोविड संसर्गाचे प्रमाण आटोक्यात येत असून संसर्ग वाढू नये यासाठी नागरिकांनी शिस्तीचे पालन करणे गरजेचे आहे.
औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठीचे पूर्वीचेच निर्बंध लागू असणार आहेत. कोरोनाबाधित कमी आढळून येत असले तरीही मोठ्या प्रमाणात कोविड चाचण्या होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने यंत्रणांनी चाचण्यांमध्ये वाढ करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले. तसेच जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी सर्वांनी कोविड नियमावलीचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केले. ते कोविड उपाय योजनांबाबतच्या जिल्हा कृती दलाची आढावा बैठकीत बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, जिल्ह्यातील कोविड संसर्गाचे प्रमाण आटोक्यात येत असून संसर्ग वाढू नये यासाठी नागरिकांनी शिस्तीचे पालन करणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनामार्फत कोविड नियंत्रणासाठी यापूर्वी जारी करण्यात आलेले निर्बंध, अटी, शर्ती जिल्हयात यापुढेही लागू राहतील. त्यानुसार दुपारी 4 नंतर सर्व व्यावसायिक आस्थापनाचे व्यवहार बंद राहतील याबाबत संबंधित यंत्रणांनी नियंत्रण ठेवावे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी चव्हाण यांनी दिले. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, मनपाचे अतिरिक्त आयुक्त बी.बी नेमाणे, पोलीस उपायुक्त मीना मकवाना यांच्यासह सर्व संबंधित यंत्रणा प्रमुख, अधिकारी उपस्थित होते.
लससाठा उपलब्धतेसाठी पाठपुरावा
जिल्ह्यातील दि. 9 ते 15 जुलैमधील कोरोनाबाधीत दर 1.24 टक्के आहे. मात्र, नागरिकांच्या कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढवणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील कोविडसाठी सुरु करण्यात आलेल्या सर्व उपचार सुविधा सद्यस्थितीत चालु ठेवण्यात आलेल्या असून आरोग्य यंत्रणांनी पूरेशा प्रमाणात ऑक्सीजन उपलब्धता ठेवण्याची खबरदारी घ्यावी. जिल्ह्याला आवश्यक प्रमाणात लससाठा उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा सुरु असल्याची माहिती ही यावेळी जिल्हाधिकारी चव्हाण दिली.