Corona Virus : सरकारी व्हेंटिलेटर गेले भाजप आमदारांच्या कोविड सेंटरमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 01:55 PM2021-05-17T13:55:22+5:302021-05-17T13:58:27+5:30
सरकारी व्हेंटिलेटरचा असाही लाभ : ग्रामीण भागातील सरकारी रुग्णालये सक्षम करण्याऐवजी सरकारी व्हेंटिलेटर खाजगी रुग्णालये आणि लोकप्रतिनिधींच्या रुग्णालयांसाठी देऊन आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन मोकळे होत आहे.
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : सरकारी व्हेंटिलेटर खाजगी रुग्णालयांपाठोपाठ आता भाजप आमदारांनी उभारलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये गेल्याचा प्रकार समोर आला आहे. ग्रामीण भागातील सरकारी रुग्णालये सक्षम करण्याऐवजी सरकारी व्हेंटिलेटर खाजगी रुग्णालये आणि लोकप्रतिनिधींच्या रुग्णालयांसाठी देऊन आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन मोकळे होत आहे. आरोग्य विभागाला म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालय आणि त्याअंतर्गत असलेल्या ग्रामीण भागांतील सरकारी रुग्णालयांसाठी गेल्या वर्षभरात १३७ नवे व्हेंटिलेटर मिळाले. मात्र, यातील तब्बल ९० व्हेंटिलेटर इतरांना वाटून आरोग्य विभाग मोकळा झाला. या सगळ्यात ग्रामीण भागात व्हेंटिलेटरचा अभाव रुग्णांच्या जिवावर उठत आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत म्हणजे गतवर्षी जिल्हा सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयांसाठी पीएम केअर फंडातून ९७ व्हेंटिलेटर मिळाले. त्याबरोबर सीएसआर फंडातून ५, सीएम कार्यालयाकडून १५ आणि हाफकिनकडून २० व्हेंटिलेटर मिळाले. तब्बल १३७ व्हेंटिलेटर प्राप्त झाले. त्यामुळे ग्रामीण भागांतील आणि उपजिल्हा रुग्णालये व्हेंटिलेटरच्या सुविधेने सुसज्ज होतील, अशी अपेक्षा होती; परंतु वर्ष उलटूनही ग्रामीण भागांतील कोरोनाच्या गंभीर रुग्णांना व्हेंटिलेटरसाठी शहरात धाव घ्यावी लागत आहे. १३७ पैकी केवळ ४७ व्हेंटिलेटर जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयात आहे. त्यातील काही व्हेंटिलेटर नादुरुस्त आणि नावालाच रुग्णालयात आहेत. तब्बल ७२ व्हेंटिलेटर घाटीला देण्यात आली, तर २६ व्हेंटिलेटर खाजगी रुग्णालयांना देण्यात आली. त्यातील नंतर काही परत घेण्यात आली; परंतु १४ व्हेंटिलेटर अद्यापही खाजगी रुग्णालयांकडेच आहेत. हे सगळे होत नाही, तर आमदारांच्या कोविड सेंटरसाठी ४ व्हेंटिलेटर देण्यात आल्याचे समोर आले आहे. लासूर स्टेशन येथे भाजप आ. प्रशांत बंब यांनी काही दिवसांपूर्वीच १०० खाटांचे कोविड केअर सेंटर उभारले. याठिकाणी आयसीयू बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड, ऑक्सिजननिर्मितीचा प्लांट आदी सुविधा आहेत. याठिकाणी हे सरकारी ४ व्हेंटिलेटर देण्यात आले आहेत. ग्रामीण भागांतील आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण करण्याची गरज आहे; परंतु त्याकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याची परिस्थिती आहे.
रुग्णांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न
४ व्हेंटिलेटर मिळाले आहेत. पडून असलेले व्हेंटिलेटर वापरून रुग्णांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासोबत रुग्णालयात आमचेही व्हेंटिलेटर आहेत. याठिकाणी एम.डी. डाॅक्टर कार्यरत आहेत. सर्व प्रक्रिया करून, पत्रव्यवहार करून हे व्हेंटिलेटर मिळविले आहेत.
-आ. प्रशांत बंब
जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ४ व्हेंटिलेटर लासूर स्टेशन येथील आ. प्रशांत बंब यांच्या कोविड केअर सेंटरसाठी देण्यात आले आहेत. त्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. जिल्हा रुग्णालयात २० व्हेंटिलेटर कार्यरत आहेत. ८ व्हेंटिलेटर नादुरुस्त आहेत. ती लवकरच दुरुस्त केली जातील. व्हेंटिलेटरची ही संख्या ३३ पर्यंत वाढविली जाईल.
-डाॅ. एस.व्ही. कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक
आराेग्य विभागाचे १३७ व्हेंटिलेटर याठिकाणी
घाटी- ७२
एमजीएम रुग्णालय- १०
अजिंठा हाॅस्पिटल- २
सावंगीकर हाॅस्पिटल- २
कन्नड ग्रामीण रुग्णालय- २
पाचोड ग्रामीण रुग्णालय- ३
वैजापूर उपजिल्हा रुग्णालय- २
गंगापूर उपजिल्हा रुग्णालय- ४
लासूर स्टेशन सीसीसी- ४
पैठण हेल्थ युनिट- ३
जिल्हा सामान्य रुग्णालय- ३३