कोरोनाचा फटका : निर्यात बंद झाल्याने तांदूळ स्वस्त; बासमतीचे भाव घसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 01:39 PM2020-03-14T13:39:50+5:302020-03-14T13:41:33+5:30
निर्यातीअभावी बासमतीचे भाव क्विंटलमागे अडीच हजार ते तीन हजार रुपयांनी गडगडले आहेत.
औरंगाबाद : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. परिणामी, जीवनावश्यक वस्तूंची आयात-निर्यात थंडावली आहे. निर्यातीअभावी बासमतीचे भाव क्विंटलमागे अडीच हजार ते तीन हजार रुपयांनी गडगडले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात भाव कमी होण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.
घाऊक बाजारपेठेत पूर्वी ९००० ते १२००० रुपये प्रतिक्विंटल विक्री होणाऱ्या प्युअर बासमतीचे भाव गडगडून सध्या ६५०० ते ९००० रुपये प्रति क्विंटलने विकले जात आहे. देशात बासमती धानचे उत्पादन चांगले झाले. मात्र, हंगामाच्या सुरुवातीलाच युरोपमध्ये तेथील सरकारने अन्नधान्य प्रशासनाने खाद्यपदार्थ निर्जंतुक जंतुनाशकाच्या नियमावलीमध्ये बदल केला. इराण व युरोपच्या निर्यातीच्या धोरणामध्ये बदल झाल्यामुळे बासमतीचा निर्यातीवर परिणाम झाला. यामुळे सुरुवातीलाच बासमतीचे भाव १ हजार रुपयांनी कमी झाले होते. त्यात आता कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अनेक देशांनी आयात बंद केली. त्याचा परिणाम देशातून होणाऱ्या बासमती निर्यातीवर झाला.
यामुळे मागील १० दिवसांत आणखी दीड ते दोन हजार रुपयांनी बासमतीचे भाव घसरले. एवढेच नव्हे तर नॉन बासमतीच्या भावातही क्विंटलमागे ४०० ते ५०० रुपयांनी घसरण होऊन आजघडीला ३८०० ते ४४०० रुपये प्रतिक्विंटल विकले जात आहे. याआधी नॉन बासमती तांदळाला निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी दिली जाणारी ५ टक्के सबसिडी यंदा केंद्र सरकारने बंद केली आहे. परिणामी, खुल्या बाजारात धानचे दर कोसळले. यामुळे सुरुवातीला नॉन बासमती तांदळाचे भावही घटले होते, अशी माहिती व्यापारी जगदीश भंडारी यांनी दिली. यंदा ग्राहकांना कमी किमतीत बासमतीच्या भाताची चव चाखता येणार आहे.
पशुखाद्यासाठी मका, ज्वारी, बाजरीला मिळेना खरेदीदार
कोरोनामुळे पोल्ट्री उद्योगाचे कंबरडे मोडले आहे. अनेक ठिकाणी कोंबड्या खड्ड्यात गाडून टाकण्यात येत आहेत. याचा परिणाम पशुखाद्य असलेल्या मका, हायब्रीड ज्वारी व बाजरीवर झाला आहे. मागणी घटल्याने ८ दिवसांत मक्याचे भाव क्विंटलमागे २०० ते २५० रुपयांनी कमी होऊन शुक्रवारी ११०० ते १३०० रुपये विकले जात होते.४महिनाभरापूर्वी हाच मका १६०० ते १९०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत विकला गेला होता. औरंगाबाद जिल्ह्यात आजघडीला सुमारे दीड लाख क्विंटलपेक्षा अधिक मक्याचा साठा असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. येथून मका पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, चाळीसगाव, धुळे आदी ठिकाणच्या पोल्ट्री उद्योगासाठी जात होता. पशुखाद्यासाठी वापरणारी ज्वारी, बाजरीचे भाव क्विंटलमागे २०० ते ४०० रुपयांपर्यंत कमी होऊन १४०० रुपयांवर आले आहेत.