शेकडो दिंड्या व वारकऱ्यांनी कोरोनाच्या संकटाला झुगारून केली षष्ठी वारी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 06:43 PM2020-03-13T18:43:04+5:302020-03-13T18:45:53+5:30
निश्चितच दिंडीतील वारकऱ्यांची संख्या कमी झालेली असली तरीही नाथांच्या श्रध्देवर आलेल्या दिंडीतील वारकऱ्यांनी नाथ समाधिवर नतमस्तक होत वारी पूर्ण केली.
पैठण :
‘देह जावो अथवा राहो।
पांडुरंगी दृढ भावो।।
चरण न सोडी सर्वथा।
तुझी आण पंढरीनाथा।।
या संत नामदेवांच्या अभंगा प्रमाणे कोरोनाच्या संकटाला झुगारून शेकडो दिंड्या व वारकरी आज पैठण शहरात दाखल झाले. निश्चितच दिंडीतील वारकऱ्यांची संख्या कमी झालेली असली तरीही नाथांच्या श्रध्देवर आलेल्या दिंडीतील वारकऱ्यांनी नाथ समाधिवर नतमस्तक होत वारी पूर्ण केली.
राज्य भरातील शेकडो दिंड्या पैठण पासून काही अंतरावर येऊन ठेपल्या नंतर प्रशासनाने नाथषष्ठी यात्रा रद्द केली. यामुळे शेकडो किलोमीटर अंतर पायी चालून आलेल्या दिंड्यांना परत फिरताना जड गेले, प्रशासनाच्या आवाहना नंतर विविध दिंड्यातील हजारो वारकरी परत फिरले मात्र नाथषष्ठी वारीसाठी दिंडीची वारी चुकू नये म्हणून मोजक्या वारकऱ्यासह दिंडी चालक महाराजांनी षष्ठी वारी पूर्ण केली.
दिंड्या पैठण शहरालगतच्या गावात मुक्कामी....
पैठण शहरात दिंड्याना राहुट्या फड टाकून मुक्काम करण्यास प्रशासनाने मनाई केल्याने वारकऱ्यांच्या दिंड्या पैठण पासून काही अंतरावर असलेल्या विविध गावात मुक्कामी थांबल्या होत्या. आज सकाळी पुन्हा या दिंड्यातील वारकरी पैठण कडे मार्गस्थ झाले. दरम्यान पैठण शहरात ठराविक कालावधीने मोजक्या वारकऱ्यासह दिंड्या पैठण शहरात दाखल होत होत्या. टाळ मृदंगाचा खणखणाट, हातात भगवा ध्वज, महिला वारकऱ्यांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन व मुखातून भानुदास एकनाथ असा जयघोष करीत छोट्या छोट्या दिंड्या नाथमंदिरात दर्शनासाठी दाखल होत होत्या.
दर्शन होताच गावाकडे रवाना....
पैठण शहरात मुक्काम करण्यास मनाई असल्याने दिंड्यांतील वारकऱ्यांना मंदिर प्रदक्षिणा व दर्शन झाल्यानंतर परत फिरावे लागले दिंडीचे दर्शन होई पर्यंत त्यांची वाहने कावसानकर स्टेडियमवर पोहचत होती. दर्शन झाल्यानंतर वारकरी स्टेडियमवर जाऊन आपल्या वाहनाने गावाकडे परत जात होते.
लक्ष्मीबाईची पूजा......
संत एकनाथ महाराजांनी बहीन मानलेल्या लक्ष्मीआईची पूजा परंपरे नुसार आज नाथवंशजाच्या हस्ते करण्यात आली. नाथषष्ठी निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी लक्ष्मीआईस नाथवंशजांनी साकडे घातले. लक्ष्मीआईची पूजा सुप्रिया गोसावी , मनवा पुष्कर महाराज गोसावी, अनुराधा गोसावी , संस्थानाधिपती हभप रावसाहेब महाराज गोसावी , हरीपंडित गोसावी , श्रेयस गोसावी , पुष्कर महाराज गोसावी , विशाल देवा दाणी , परीक्षित वैद्य , भास्कर देवा देशपांडे आदिंनी केली.
नाथवंशजाकडून षष्ठीचे निमंत्रण......
आज नाथवंशजांच्या वतीने षष्ठीसोहळ्यात सहभागी व्हावे म्हणून पांडुरंग भगवंतास अक्षत ( निमंत्रण) दिले गेले. याचप्रमाणे षष्ठीतील मानकरी नाथोपाध्ये, संतकवी, अमृतराय संस्थान, भगवान गड, हभप अंमळनेरकर महाराज, यांना ही नाथवंशजांकडून अक्षत देऊन निमंत्रण देण्यात आले.
विविध शासकीय कार्यालये यात्रा मैदानात......
वारकर्यांना सेवा सुविधा देण्यासाठी यात्रा परिसरात नगर परिषदेने कार्यालय हलविले आहे या कार्यालयातून सर्व सुत्रे हालविण्यात येत आहेत, तात्पुरते अस्थायी पोलिस कार्यालय सुध्दा यात्रा मैदानात स्थलांतरीत करण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या वतीने यात्रा मैदानात दवाखाना सुरू करण्यात आला आहे.