Corona Virus : एक उमदा, होतकरू डॉक्टर गमावला; ऊसतोड मजुराच्या मुलाची कोरोनाशी झुंज अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 07:41 PM2021-05-26T19:41:42+5:302021-05-26T19:42:48+5:30

Corona Virus : इंटर्न म्हणून कोविड वॉर्डात रुग्णसेवा देत असताना झाली कोरोनाची लागण

Corona Virus: Lost a noble, budding doctor; sugarcane labor's son fails to fight with Corona | Corona Virus : एक उमदा, होतकरू डॉक्टर गमावला; ऊसतोड मजुराच्या मुलाची कोरोनाशी झुंज अपयशी

Corona Virus : एक उमदा, होतकरू डॉक्टर गमावला; ऊसतोड मजुराच्या मुलाची कोरोनाशी झुंज अपयशी

googlenewsNext
ठळक मुद्देडॉ. राहुल पवार याची दाखल झाल्यापासून प्रकृती गंभीर होती. उपचार सुरु असताना त्यास म्युकरमायकोसिसचेही निदान झाले होते.

औरंगाबाद : ऊसतोड मजुराच्या डॉक्टर मुलाची कोरोनाशी जवळपास महिनाभरापासूनची झुंज आज अपयशी ठरली. कोविडयोद्धा डॉ. राहुल पवारला रुग्णांवर उपचार करतांना कोरोनाची बाधा झाली. त्यानंतर त्याच्यावर १ मे पासून औरंगाबाद येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. येथेच आज दुपारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

परभणी जिल्ह्यातील आनंदनगर तांडा (ता. पाथरी) येथील ऊसतोड मजुराच्या कुटुंबात राहुल पवारचा जन्म झाला. लातूर येथील एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर तो तेथेच इंटर्न म्हणून कोविड वॉर्डात रुग्णसेवा देत होता. याचदरम्यान त्याच्याभोवती कोरोनाने कधी फास आवळला ते त्यालाही कळले नाही. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याची प्रकृती अधिक गुंतागुंतीची झाली. त्याच्या मित्रांनी त्याला १ मेला औरंगाबादेतील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, दिवसेंदिवस त्याची प्रकृती गंभीर होत गेली. कोरोनाला हरवून तो येईल, अशी आशा होती. परंतु नियतीला ते मान्य नव्हते. बुधवारी दुपारी ३.१५ मिनिटाने डॉ. राहुल पवार याने या जगातून कायमचा निरोप घेतला. ही माहिती कळताच कुटुंबिय, मित्रपरिवाराला एकच धक्का बसला.

राहुलच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्यामुळे सुरुवातीला त्याच्या सहकारी मित्रांनीच पैसे गोळा करून उपचार व औषधींचा खर्च भागविला. दिवसेंदिवस त्याची प्रकृती गंभीर होत असल्याने दवाखान्याचा खर्च लाखोंच्या पटीत चालला. त्यामुळे मित्रांनी समाजमाध्यमांवर राहुलच्या उपचारांच्या खर्चासाठी मदतीचे आवाहन केले. अनेक दानशुरांनी मदतीचा हात दिला. दरम्यान, एमजीएम रुग्णालयाने राहुलवर मोफत उपचार करण्याचा निर्णय घेतला. उपचारासाठीचे घेतलेली रक्कमसुद्धा रुग्णालयाने परत केली. राहुल पवार या होतकरू डॉक्टरच्या प्रकृतीविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, वैद्यकीय शिक्षण संचालक तात्याराव लहाने हेदेखील नियमितपणे एमजीएम हॉस्पिटलच्या संपर्कात होते.

प्रकृती होती गंभीर
डॉ. राहुल पवार याची दाखल झाल्यापासून प्रकृती गंभीर होती. १६ मेपासून तो व्हेंटिलेटरवर होता. दरम्यान उपचार सुरु असताना त्यास म्युकरमायकोसिसचेही निदान झाले होते. त्याचेही उपचार सुरु होते. इंजेक्शन देण्यात आले होते. परंतु उपचार सुरु असताना बुधवारी दुपारी मृत्यू झाला, अशी माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एच. आर. राघवन यांनी सांगितले.

Web Title: Corona Virus: Lost a noble, budding doctor; sugarcane labor's son fails to fight with Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.