नवे आव्हान ! कोरोनाच्या रुग्णांत घट झाल्याने दिलासा; मात्र गंभीर रुग्णांच्या वाढीने चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 12:51 PM2021-04-27T12:51:07+5:302021-04-27T12:55:31+5:30
corona virus in Aurangabad : दररोज निदान होणाऱ्या रुग्णांत व्हेंटिलेटर, आयसीयू बेडची गरज असलेल्या रुग्णांचे प्रमाणही चिंताजनक ठरत आहे.
औरंगाबाद : जिल्ह्यात १५ एप्रिलपासून दररोज निदान होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने दिलासा व्यक्त होत आहे; पण सध्या कोरोनाने गंभीर रूप घेतल्याची परिस्थिती आहे. कारण दररोज निदान होणाऱ्या रुग्णांत गंभीर रुग्णांची संख्या वाढत आहे. परिणामी, जिल्ह्यात एकही व्हेंटिलेटर शिल्लक नाही, तर आयसीयू बेडही रुग्णांनी भरले आहेत. व्हेंटिलेटर रिकामे होण्याची वाट पाहण्याची दुर्दैवी वेळ रुग्णांवर ओढवत आहे.
जिल्ह्यात एक लाखावर रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या १४ हजारांच्या घरात आली आहे; पण आरोग्य यंत्रणेपुढे नवे आव्हान उभे राहत आहे. दररोज निदान होणाऱ्या रुग्णांत व्हेंटिलेटर, आयसीयू बेडची गरज असलेल्या रुग्णांचे प्रमाणही चिंताजनक ठरत आहे. आरोग्य विभागानुसार २ टक्के रुग्णांना व्हेंटिलेटर, आयसीयू बेडची गरज असते; परंतु जिल्ह्यातील गंभीर रुग्णांच्या संख्येपुढे व्हेंटिलेटरची संख्या अपुरी पडत आहे. कारण एका व्हेंटिलेटरवर एक रुग्ण किमान १० ते १५ दिवस असतो. त्यात रोज गंभीर रुग्णांची भर पडत आहे. अशा स्थितीत व्हेंटिलेटरशिवाय रुग्णांवर उपचार करण्याचे आव्हान डाॅक्टरांपुढे उभे राहत आहे. आयसीयू बेडही रुग्णांनी भरून गेले आहेत. दुसरीकडे सौम्य स्वरूपातील, तसेच लक्षणे नसलेल्या रुग्णांचे आयसोलेशन बेड ५० टक्क्यांवर रिक्त आहेत. त्यामुळे आता गंभीर रुग्णांसाठी आवश्यक असलेली यंत्रणा वाढविण्याची गरज आहे.
घाटीत ४९४ गंभीर रुग्ण
घाटी रुग्णालयात सध्या तब्बल ४९४ रुग्ण गंभीर आहेत. याठिकाणी आयसीयू, व्हेंटिलेटरची व्यवस्था वाढविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत; परंतु खाजगी रुग्णालयांत व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे नातेवाईक सर्वत्र भटकंती करून शेवटी घाटीत येत असल्याची स्थिती आहे.
२ टक्के रुग्णांनाच गरज
१० मेपासून कोरोनाची संख्या कमी होईल, अशी परिस्थिती आहे. शंभर रुग्णांत २ टक्के रुग्ण असे असतात, त्यांना व्हेंटिलेटर, ऑक्सिजनची गरज असते. तब्बल ८५ टक्के रुग्णांना लक्षणे दिसून येत नाहीत.
- डाॅ. स्वप्नील लाळे, आरोग्य उपसंचालक
बहुतांश रुग्णांना हवा ऑक्सिजन
सध्या कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत आहे; पण जे रुग्ण आढळत आहेत, त्यातील बहुतांश जणांना ऑक्सिजन लागत असल्याची स्थिती आहे. पहिल्या लाटेत खाटा वाढविण्यात आल्या, तर ऑक्सिजनची सुविधा वाढविण्यावर भर दिला जात आहे.
- डाॅ. एस. व्ही. कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक
जिल्ह्यातील स्थिती :
आयसीयू बेड-६३७
रिक्त आयसीयू बेड-८८
व्हेंटिलेटर-३०५
रिक्त व्हेंटिलेटर- ०
आयसोलेशन बेड-४,७२४
रिक्त आयसोलेशन बेड-२,५६९