Corona Virus : ना रुग्णसंख्या लपवली ना मृत्यू, महाराष्ट्र प्रामाणिक राज्य : सुभाष देसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 03:24 PM2021-06-11T15:24:33+5:302021-06-11T15:25:47+5:30
Subhash Desai on Corona Virus Death Numbers राज्यातील विविध जिल्ह्यांनी कळविलेल्या दैनंदिन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, मृत्यूसंख्याची आरोग्य विभागाने जाहीर केलेली एकूण आकडेवारी आणि आयसीएमआरच्या पोर्टलवरील नोंद यामध्ये तफावत आढळून येत आहे.
औरंगाबाद : कोरोना रुग्णांच्या मृत्यू संख्येत तफावत आढळून आली आहे, हे आम्ही प्रामाणिकपणे मान्य केले आहे. महाराष्ट्र राज्य प्रामाणिक आहे. ना कोरोना रुग्णसंख्या ना मृत्युसंख्या लपवली. रुग्णांचा कोरोना अहवाल येण्यापूर्वी मृत्यू झाल्याने त्याची नोंद राहून गेल्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले.
राज्यातील विविध जिल्ह्यांनी कळविलेल्या दैनंदिन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, मृत्यूसंख्याची आरोग्य विभागाने जाहीर केलेली एकूण आकडेवारी आणि आयसीएमआरच्या पोर्टलवरील नोंद यामध्ये तफावत आढळून येत आहे. जाहीर केलेली आणि पोर्टलवरील आकडेवारीत कोरोना रुग्ण आणि मृत्यूसंख्या यात मोठा फरक आढळून आल्याने मृत्यूदर कमी दाखविण्यात येत असल्याचा आरोप होत आहेत. यावर पालकमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, राज्याने कधीच आकडेवारी लपवली नाही. राज्य प्रामाणिकपणे काम करत आहे. सुरुवातीला कोरोना चाचणीचा अहवाल उशिरा मिळत असे, दरम्यानच्या काळात रुग्णाचा मृत्यू झाला तर त्याची नोंद तत्कालीन लक्षणानुसार दुसऱ्या आजाराने मृत्यू झाल्याची करण्यात आली. त्यानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला तरी तशी नोंद घेणे राहिल्याने मृत्यूच्या आकड्यात तफावत आढळून येत आहे. ही बाब मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ज्यांचा मृत्यूनंतर पॉझिटिव्ह रिपोर्ट आला आहे त्याची कोरोना मृत्यू म्हणून नोंद करण्याचे आदेश दिले. यामुळे आकडेवारी लपवली नसून योग्य नोंद झाली नसल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले.
महापालिका निवडणुका ६ महिन्यानंतर
महापालिका निवडणूक होणार आहेत. निवडणूक आयोगाने बैठक घेऊन निवडणुका यापुढे वेळेत होतील. त्याची तयारी आहे. राज्य शासनाची चर्चा करून निवडणूक आयोग निर्णय घेईल. येत्या ६ महिन्यात निवडणुका घेण्यात येतील अशी शक्यता आहे. मात्र, कोरोनाचे संकट अजून संपलेले आहे. यामुळे निवडणुकीबद्दल निश्चित सांगण्यात येणार नाही असेही देसाई यावेळी म्हणाले.