Corona Virus: गर्दीच्या ठिकाणांचे आता व्हिडिओ चित्रीकरण; गुन्हा, दंड, सिलिंगची होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2022 06:35 PM2022-01-05T18:35:28+5:302022-01-05T18:37:36+5:30
Corona Virus in Aurangabad :कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले
औरंगाबाद : शहरात कोरोनाचा ( corona virus in Aurangabad ) उद्रेक होण्यास सुरुवात झाली आहे. दुसऱ्या लाटेच्या तुलनेत आता संसर्ग वेगाने होत असल्याचे दिसू लागल्याने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गर्दीच्या ठिकाणांचे व्हिडिओ चित्रीकरण करण्याचे आदेश मंगळवारी एका बैठकीत दिले.
यासाठी पथक नेमण्याच्या सूचना केल्या असून, नियमाच्या तुलनेत क्षमतेपेक्षा जास्त गर्दी असल्यास संबंधित हॉटेल, दुकाने, शोरूम्स, मॉल्स व विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करून दंड लावणे, ती मालमत्ता सील करण्याची कारवाई करावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी म्हणाले, येत्या एक-दोन दिवसांत चित्रीकरणाची तयारी होईल. रुग्णसंख्या वाढू लागली आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले असून, मंगल कार्यालये, हॉटेल्स, परमिट रूम, शोरूम्स, व्यापारी बाजारपेठेतील मोठी दुकाने, यामध्ये प्रशासनाने निर्धारित करून दिलेल्या क्षमतेपेक्षा जास्त गर्दी असेल, तर त्याचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येईल. यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक आस्थापनांना गर्दीची क्षमता ठरवून दिली आहे. त्या नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई निश्चितपणे होईल.
अद्याप शाळा बंद करण्याचा निर्णय नाही
शाळा बंद करण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. शासनाकडून जे आदेश येतील, त्यानुसार शाळेतील कोणते वर्ग सुरू ठेवायचे, कोणते बंद ठेवायचे, याचा निर्णय होईल. आरटीपीसीआर, ॲण्टीजेन चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याचे आदेश दिले आहेत. लसीकरणाचा वेग वाढविण्याच्या सूचनादेखील केल्या आहेत. नागरिकांनी विनाकारण गर्दीत जाणे टाळावे, कोरोना पार्श्वभूमीवरील सर्व नियम कटाक्षाने पाळावेत, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
आदेशांचीच गर्दी
कोरोना, डेल्टा, ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आपत्ती प्राधिकरणाने पहिल्या लाटेपासून आजवर २०० हून अधिक आदेश काढले आहेत. आदेशांची अंमलबजावणी दुसऱ्या लाटेपर्यंत झाली. परंतु आता तिसऱ्या लाटेच्या तोंडावर रुग्णसंख्या वाढत असताना बेशिस्तांना शिस्त कशी लावणार, असा प्रश्न आहे.