corona virus : पुणे, मुंबई, नागपूर बस प्रवाशांवर ठेवा ‘वॉच’; खबरदारीच्या सूचना जारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 12:56 PM2020-03-16T12:56:49+5:302020-03-16T12:59:51+5:30
बसमध्ये एखादा कोरोना संशयित प्रवासी आढळून आल्यास त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचना करण्यात आल्या.
औरंगाबाद : प्रादेशिक परिवहन कार्यालयात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बस असोसिएशन, औरंगाबाद, टुरिस्ट टॅक्सी असोसिएशन, औरंगाबाद आणि एसटी महामंडळ यांची बैठक घेण्यात आली. यावेळी पुणे, मुंबई, नागपूर येथून येणाऱ्या प्रवासी बस वाहतुकीतून कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव औरंगाबादमध्ये होऊ नये, यासाठी काही उपाययोजना जारी करण्यात आल्या.
बैठकीत या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. याप्रसंगी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील माने यांची उपस्थिती होती. बैठकीत काही आदेश पारित करण्यात आले. यात प्रत्येक वाहनांमध्ये कोरोनाबाबतच्या उपाययोजनांबाबत पत्रके लावणे, प्रवासी चढ-उतार करणारे ठिकाणी कोरोनाविषयी जनजागृती करणारे बॅनर्स लावणे, खाजगी तसेच एसटी महामंडळाच्या बसमधील वाहकांनी त्यांच्या वाहनातील प्रवाशांची विचारपूस करूनच (आजारी असल्याबाबत) त्यांना प्रवेश देणे, प्रत्येक प्रवाशाचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक लिहून घेण्याचे आदेश देण्यात आले.
बसमध्ये एखादा कोरोना संशयित प्रवासी आढळून आल्यास त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचना करण्यात आल्या. बसमध्ये शक्य असल्यास त्यांनी सॅनिटायझर ठेवण्याचीही सूचना बस मालकांना करण्यात आली.