Corona Virus : रुग्णालयातील समृद्ध अडगळ; पीएम केअर फंडातील व्हेंटिलेटर ठरले निरुपयोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 02:05 PM2021-05-13T14:05:52+5:302021-05-13T14:20:31+5:30

Corona Virus : भारत इलेट्रॉनिक्स लिमिटेड (बेल), आग्वा लि., ज्योती सीएनसी, एएमटीझेड या कंपन्यांनी पीएम केअर फंडातून ‘मेक इन इंडिया’अंतर्गत व्हेंटिलेटर बनविले आणि पूर्ण देशात वितरित केले.

Corona Virus : Rich barrier in the hospital; The ventilator in the PM Care Fund turned out to be useless | Corona Virus : रुग्णालयातील समृद्ध अडगळ; पीएम केअर फंडातील व्हेंटिलेटर ठरले निरुपयोगी

Corona Virus : रुग्णालयातील समृद्ध अडगळ; पीएम केअर फंडातील व्हेंटिलेटर ठरले निरुपयोगी

googlenewsNext
ठळक मुद्देरुग्णांचा कोंडलेला श्वास मोकळा करण्याऐवजी व्हेंटिलेटरच घेताहेत अंतिम श्वासराजकीय वर्तुळातून व्हेंटिलेटर खरेदीची उच्चस्तरीय चौकशीची मागणी होत आहे.

औरंगाबाद : पंतप्रधान साहाय्यता निधीतून (पीएम केअर फंड) घाटी रुग्णालयासह जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत दिलेल्या व्हेंटिलेटरवर ‘नॉट वर्किंग’चे बोर्ड लागले आहेत. घाटीसह एमजीएम रुग्णालय व इतर अनेक रुग्णालयांच्या कोविड वॉर्डामध्ये ‘ते व्हेंटिलेटर समृद्ध अडगळ’ ठरत आहेत. घाटीमध्ये विनावापर ५० व्हेंटिलेटर पडून आहेत. राजकीय वर्तुळातून व्हेंटिलेटर खरेदीची उच्चस्तरीय चौकशीची मागणी होत आहे.

सध्या जिल्ह्यातील ४१४ व्हेंटिलेटरही कमी पडत आहेत. केंद्र शासनाकडून प्राप्त व्हेंटिलेटर सुसज्ज असते, तर ५०० हून अधिक व्हेंटिलेटर कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध झाले असते. जिल्ह्यात २ महिन्यांत कोरोनामु‌‌ळे १,५०० अधिक रुग्ण दगावले आहेत. त्यातील अनेकांना वेळेत व्हेंटिलेटर, बेड व ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकला नाही. अशी भयावह परिस्थिती एकीकडे असताना पीएम केअर फंडातून मिळालेले ५० व्हेंटिलेटर घाटीमध्ये धूळखात पडलेले आहेत. दुसरीकडे व्हेंटिलेटर असूनही ते नादुरुस्त आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल २०२० मध्ये पीएम केअर फंडाची स्थापना करून यात दानशूरांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. यात नागरिक, उद्योजक, सेलिब्रेटींनी पुढाकार घेत मदत केली. यातूनच कोरोना उपचार साधने घेण्यात आली. त्यात व्हेंटिलेटरचादेखील समावेश होता.

चार कंपन्यांनी केला व्हेंटिलेटर पुरवठा
भारत इलेट्रॉनिक्स लिमिटेड (बेल), आग्वा लि., ज्योती सीएनसी, एएमटीझेड या कंपन्यांनी पीएम केअर फंडातून ‘मेक इन इंडिया’अंतर्गत व्हेंटिलेटर बनविले आणि पूर्ण देशात वितरित केले. त्यातील १५० व्हेंटिलेटर घाटी हॉस्पिटलला मिळाले. गतवर्षी भारतात व्हेंटिलेटरचे उत्पादन होत नव्हते. त्यामुळे गेल्यावर्षी या चार कंपन्यांनी उत्पादन करून तात्पुरती गरज भागविण्याचा प्रयत्न केला. भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. (बेल) ही कंपनी ईव्हीएम मशीनचे उत्पादन करते. या कंपनीचे कस्टमर केअर मॅनेजरशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, आम्ही व्हेंटिलेटर वापराचे प्रशिक्षण दिले आहे.

व्हेंटिलेटरची खरेदी; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
‘लोकमत’मध्ये १२ मेच्या अंकात व्हेंटिलेटरसंदर्भातील वृत्त प्रकाशित झाल्यानंतर विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधी, नेत्यांनी व्हेंटिलेटर खरेदीबाबत उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. यामध्ये एमआयएम, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा, लोकप्रतिनिधींचा समावेश आहे.

राष्ट्रवादीच्या आमदारांकडून आज पाहणी
पदवीधर मतदारसंघाचे राष्ट्रवादी पक्षाचे आ. सतीश चव्हाण गुरुवारी दुपारी घाटी हॉस्पिटलमध्ये पाहणीसाठी जाणार आहेत. बैठकीत केंद्र शासनाकडून आलेल्या व्हेंटिलेटरच्या स्थितीचा आढावा घेणार आहेत. उच्चस्तरीय चौकशीच्या मागणीसाठी राज्य सरकारला निवेदन देणार असल्याचे आ. चव्हाण यांनी सांगितले.

ही दिशाभूल असल्याचा शिवसेनेचा आरोप
केंद्र शासनाने निकृष्ट दर्जाचे व्हेंटिलेटर पुरवून राज्य शासन आणि जनतेची दिशाभूल केली आहे. या प्रकरणात केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येईल. शिवाय मुख्यमंत्री आणि राज्य आरोग्यमंत्र्यांनादेखील निवेदन देऊन उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात येईल, असे माजी खा. चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.

काँग्रेस करणार चौकशीची मागणी
काँग्रेसचे जिल्हाप्रमुख माजी आ. डॉ. कल्याण काळे यांनी सांगितले, व्हेंटिलेटरमध्ये तांत्रिक अडचण काय आहे, याची माहिती घाटीच्या अधिष्ठातांकडून घेण्यात येईल. व्हेंटिलेटर जर निकृष्ट असतील, तर याबाबत चौकशी झाली पाहिजे. काँग्रेस राज्य शासनाकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी करणार आहे.

भाजपाचा दावा व्हेंटिलेटर चांगले
भाजपाचे खा. डॉ. भागवत कराड यांनी सांगितले, पहिल्या टप्प्यातील व्हेंटिलेटर चांगले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील व्हेंटिलेटर नादुरुस्त असतील, तर ते तज्ज्ञांकडून तपासून घ्यावे लागतील. याबाबत केंद्रीय आरोग्य विभागाशी पत्रव्यवहार केल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Corona Virus : Rich barrier in the hospital; The ventilator in the PM Care Fund turned out to be useless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.