corona virus : रेमडेसिविर इंजेक्शनची औरंगाबादमध्ये चढ्यादराने विक्री; सात जणांची टोळी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 06:42 PM2021-04-27T18:42:09+5:302021-04-27T18:45:36+5:30
Remedesivir Black Marketing : आरोपी दिनेश नवगिरे याने रेमडेसिविर इंजेक्शन जालना येथील कोविड केअर सेंटरमधील कर्मचारी आणि मित्रांच्या मदतीने आणले असल्याची कबुली दिली.
औरंंगाबाद : जालना येथील कोविड केअर सेंटरमधून रेमडेसिविर इंजेक्शन आणून त्याची औरंगाबादेत चढ्या दराने विक्री करणाऱ्या ७ जणांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. या टोळीकडून पोलिसांनी पाच रेमडेसिविर इंजेक्शन, ६ मोबाइल, एक कार असा एकूण ५ लाख ६४ हजार ५८७ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दिनेश कान्हू नवगिरे (वय २८, रा. जयभीमनगर, घाटी रोड), साईनाथ अण्णा वाहूळ (वय ३२, रा. रामनगर), रवि रोहिदास डोंगरे (रा. भाग्यनगर) तसेच संदीप सुखदेव रगडे (वय ३२), प्रवीण शिवनाथ बोर्डे (वय २७), नरेंद्र मुरलीधर साबळे (वय ३३) आणि अफरोज खान इकबाल खान (हे सर्व रा. बदनापूर, जि. जालना) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
झाले असे की, रेमडेसिविर इंजेक्शन चढ्या दराने विक्री होत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी या इंजेक्शनची चढ्या दराने विक्री करणारी टोळी गजाआड करण्यासाठी सहायक निरीक्षक मनोज शिंदे, अजबसिंग जारवाल, अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक राजगोपाल बजाज, पोलीस अंमलदार संतोष सोनवणे, चंद्रकांत गवळी, शिवाजी झिने, राजेंद्र साळुंके, विशाल पाटील आदींचे पथक तयार करून सापळा रचला.
जमादार विशाल पाटील यांनी बनावट ग्राहक बनून टोळीचा मुख्य सूत्रधार दिनेश नवगिरे यास रेमडेसिविर इंजेक्शनसाठी फोन केला. व्यवहार ठरल्यानुसार पाटील यांनी दिनेशच्या अकाउंटवर फोन पेद्वारे २० हजार रुपये टाकले. तेव्हा दिनेशने इंजेक्शन घेण्यासाठी पाटील यांना घाटी हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहाजवळील रिक्षा स्थानकाजवळ बोलावले. तेथे अगोदरच गुन्हे शाखेचे पथक दबा धरून बसले होते. इंजेक्शन देताना या पथकाने दिनेशला पकडले.
चौकशीदरम्यान दिनेश नवगिरे याने सदरील रेमडेसिविर इंजेक्शन जालना येथील कोविड केअर सेंटरमधील कर्मचारी आणि मित्रांच्या मदतीने जास्तीच्या दराने विक्री करण्यासाठी आणले असल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या सर्व साथीदारांना अटक करून त्यांच्या ताब्यातून ५ रेमडेसिविर इंजेक्शन, ६ मोबाइल, कार (एमएच २४- एम- ५६) असा एकूण ५ लाख ६४ हजार ५८७ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. अटकेत असलेल्या टोळीविरुद्ध अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक राजगोपाल बजाज यांनी दिलेल्या तक्रारीवरून बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.