गंभीर अवस्था; ग्रामीण भागातील २५ लाख लोकसंख्येसाठी केवळ १८ सरकारी व्हेंटिलेटर, रुग्णांची शहरात भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 07:13 PM2021-04-23T19:13:42+5:302021-04-23T19:15:28+5:30

corona virus : ग्रामीण भागात तज्ज्ञांबरोबर गंभीर रुग्णांवर उपचार करणारी यंत्रणाच नाही.

corona virus : Severe condition; Only 18 government ventilators for a population of 2.5 million in rural areas of Aurangabad, patients roaming the city for ventilator | गंभीर अवस्था; ग्रामीण भागातील २५ लाख लोकसंख्येसाठी केवळ १८ सरकारी व्हेंटिलेटर, रुग्णांची शहरात भटकंती

गंभीर अवस्था; ग्रामीण भागातील २५ लाख लोकसंख्येसाठी केवळ १८ सरकारी व्हेंटिलेटर, रुग्णांची शहरात भटकंती

googlenewsNext
ठळक मुद्देरुग्ण गंभीर झाला की रेफर, मृत्यूच्या प्रमाणात चिंताजनक वाढ व्हेंटिलेटरसाठी ग्रामीण रुग्णांची शहरात भटकंती सुरु आहे 

औरंगाबाद : कोरोना महामारीच्या विळख्याने आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण करण्यावर भर दिला जात आहे. परंतु ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा ‘जैसे थे’च आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागांतील लोकसंख्या सुमारे २५ लाख आहे. मात्र, या २५ लाख लोकांची मदार केवळ १८ सरकारी व्हेंटिलेटरवर आहे. परिणामी, रुग्ण गंभीर झाला की, शहरात कर रेफर अशी ग्रामीण भागाची दुर्दैवी अवस्था आहे. त्यातून मृत्यूचे प्रमाणही वाढत असल्याची चिंता व्यक्त होत आहे.

औरंगाबाद शहरात रुग्णांच्या वाढत्या संख्येने चिंता व्यक्त केली जात होती. परंतु शहरातील रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांत घट झाल्याने दिलासा मिळाला आहे. आता ग्रामीण भागांत रुग्ण संख्या वाढत आहे. त्याबरोबर ग्रामीण भागांतील रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. ग्रामीण भागात तज्ज्ञांबरोबर गंभीर रुग्णांवर उपचार करणारी यंत्रणाच नाही. उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालये अशा ठिकाणी केवळ १८ व्हेंटिलेटर उपलब्ध आहे. त्यातही काही व्हेंटिलेटर नावालाच आहेत. रुग्ण गंभीर असला तर सरळ घाटीचा रस्ता दाखविला जात आहे. त्यामुळे शहरात येईपर्यंत रुग्णाची प्रकृती गंभीर होत असल्याची धक्कादायक स्थिती आहे.

रेफर करण्यापूर्वी हे करा, घाटीची सूचना
ग्रामीण भागातील कोविड केअर केंद्र, रुग्णालय या ठिकाणाहून रुग्णांना रेफर करण्यापूर्वी त्यांना ज्या वैद्यकीय गोष्टींची गरज आहे, त्याची पूर्तता केली पाहिजे. रेफर करण्यापूर्वी किमान २ तास रुग्णाला १० लिटर प्रति मिनिट ऑक्सिजन दिला पाहिजे. त्यानंतरच रेफर करावे, अशी सूचना घाटी प्रशासनाने मांडली आहे.

२१ दिवसात तब्बल २६७ मृत्यू
१ एप्रिल ते २१ एप्रिल या कालावधीत ग्रामीण भागातील तब्बल २६७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यातही गेल्या ९ दिवसातच १२८ लोकांचे प्राण गेले.

ग्रामीण भागातील स्थिती
दिनांक- एकूण मृत्यू - एकूण रुग्ण
१ मार्च - ३७०- १६,४४६
१६ मार्च- ३९५- १८,२१६
३१ मार्च- ४८०- २४,५४२
१६ एप्रिल- ६६१- ३४,२६९
२१ एप्रिल ७४७ - ३८,३२०

ग्रामीण भागात याठिकाणी सरकारी व्हेंटिलेटर
-गंगापूर - ८ व्हेंटिलेटर
-वैजापूर - २ व्हेंटिलेटर
-सिल्लोड- २ व्हेंटिलेटर
- कन्नड - २ व्हेंटिलेटर
-अजिंठा -२ व्हेंटिलेटर
-पाचोड - २ व्हेंटिलेटर

सर्व व्हेंटिलेटर वापरात
ग्रामीण भागात जेवढे व्हेंटिलेटर आहेत, ते सध्या वापरण्यात येत आहे. गंगापूर येथे चांगले काम सुरू आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात ३४ व्हेंटिलेटर आहेत. येथे आणखी ४ व्हेंटिलेटर कार्यान्वित करण्याचे काम सुरू आहे.
-डाॅ. एस. व्ही. कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक

ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध
ग्रामीण भागात वैजापूर, सिल्लोड, गंगापूर येथे व्हेंटिलेटर आहे. त्याबरोबर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरही आहेत. आमच्या अंतर्गत कोविड केअर सेंटर आहेत. याठिकाणी ऑक्सिजन सिलिंडरची सुविधा आहे. किती रुग्ण रेफर होतात, हे पहावे लागेल.
-डाॅ. सुधाकर शेळके, जिल्हा आरोग्य अधिकारी

Web Title: corona virus : Severe condition; Only 18 government ventilators for a population of 2.5 million in rural areas of Aurangabad, patients roaming the city for ventilator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.