Corona Virus : धक्कादायक ! दुसऱ्या लाटेत व्हेंटिलेटरवरील ७५० पैकी ५०९ रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 07:01 PM2021-06-01T19:01:08+5:302021-06-01T19:01:31+5:30

Corona Virus :जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत म्हणजे मार्चपासून आतापर्यंत तब्बल ९२ हजार नव्या रुग्णांची भर पडली. यात व्हेंटिलेटरची गरज असलेल्या रुग्णांची संख्या अधिक होती.

Corona Virus: Shocking! The second wave killed 509 of the 750 patients on the ventilator | Corona Virus : धक्कादायक ! दुसऱ्या लाटेत व्हेंटिलेटरवरील ७५० पैकी ५०९ रुग्णांचा मृत्यू

Corona Virus : धक्कादायक ! दुसऱ्या लाटेत व्हेंटिलेटरवरील ७५० पैकी ५०९ रुग्णांचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देव्हेंटिलेटर्सच्या स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर, इन्फेक्शनचा धोका

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूचे तांडव पाहायला मिळत आहे. दररोज रुग्णांचा मृत्यू ओढवत आहे. दुसऱ्या लाटेत घाटी आणि जिल्हा रुग्णालयातील व्हेंटिलेटरवरील ७५० रुग्णांपैकी तब्बल ५०९ रुग्णांचा मृत्यू ओढवला. यात घाटीतील काही आयसीयूतील आकडे मिळू शकले नाहीत. त्यामुळे ही संख्या यापेक्षा अधिक असल्याची शक्यता आहे. गंभीर रुग्णांसाठी व्हेंटिलेटर म्हणजे प्राणरक्षक प्रणाली म्हटले जाते, परंतु प्राणरक्षक प्रणाली मिळूनही मृत्यू ओढावल्याचे प्रमाण चिंताजनक ठरत आहे.

जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत म्हणजे मार्चपासून आतापर्यंत तब्बल ९२ हजार नव्या रुग्णांची भर पडली. यात व्हेंटिलेटरची गरज असलेल्या रुग्णांची संख्या अधिक होती. व्हेंटिलेटरसाठी अक्षरश: भटकंती करावी लागली. कोरोनाची दुसरी लाट ओसरताना म्युकरमायकोसिसला कोरोना रुग्णांना आणि कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना सामोरे जावे लागत आहे. व्हेंटिलेटरवरील रुग्णांसाठी ईटी ट्यूब आणि ह्यूमीडिफायर वापरले जाते. त्याची स्वच्छता, निर्जंतुकीकरण नियमितपणे होणे गरजेचे आहे. अन्यथा इन्फेक्शनचा धोका नाकारता येत नाही. ही सर्व जबाबदारी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या खांद्यावरच आहे. त्यांची स्वच्छता, निर्जंतुकीकरण होते का, यावर नातेवाईकांना लक्षच ठेवता येत नाही. कारण रुग्णांजवळ त्यांना जाता येत नाही. स्वच्छता, निर्जंतुकीकरणावर भर दिला जातो, असा रुग्णालयांचा दावा आहे.

घाटी रुग्णालय
घाटी रुग्णालयात मार्च ते मेदरम्यान ५६६ व्हेंटिलेटरवर होते. यातील तब्बल ४०० रुग्णांचा मृत्यू झाला. १६६ रुग्ण बरे होऊन गेले. काही कक्षातील व्हेंटिलेटरवरील रुग्णांची माहिती प्राप्त होऊ शकली नाही. त्यामुळे व्हेंटिलेटरवरील रुग्णांचा आणि मृत्यूची संख्या अधिक असल्याची शक्यता आहे. कोरोनाच्या वाॅर्डात, आयसीयूमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांशिवाय कोणालाही जाता येत नाही. रुग्णांच्या नातेवाईकांनाही प्रवेश दिला जात नाही. ह्यूमीडिफायरची स्वच्छता कधी होते, नातेवाईकांना कळतच नाही.

डाॅक्टर्स म्हणतात, नियमित स्वच्छता
दुसऱ्या लाटेत रोज किमान ९० रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. ह्यूमीडिफायरची नियमितपणे स्वच्छता केली जाते. त्यात फिल्टर असते, ते स्वच्छ केले जाते. कोणत्या प्रकारचे व्हेंटिलेटर आहे, यावर त्याची स्वच्छता कधी केली पाहिजे, हे अवलंबून असते.
-डाॅ. मीनाक्षी भट्टाचार्य, मेडिसीन विभागप्रमुख, घाटी

स्वच्छतेच्या सूचना
ह्यूमीडिफायरची नियमितपणे स्वच्छता केली जाते. कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार त्यातील पाणी रोज बदलले जाते. डिस्टिल वॉटर वापरले जाते. या ऑक्सिजन बाटल्यांचे निर्जंतुकीकरणही केले जाते. ईटी ट्यूब ही रुग्णांच्या गरजेनुसार टाकली जाते.
- डाॅ. सुनील गायकवाड, जिल्हा रुग्णालय

जिल्हा सामान्य रुग्णालय
जिल्हा सामान्य रुग्णालयात मार्च ते मेदरम्यान १८४ रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. यातील तब्बल १०९ रुग्णांचा मृत्यू झाला. तर ५० रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर २५ रुग्णांना रेफर करावे लागले. प्रकृती गंभीर झाल्यामुळे रुग्णांना व्हेंटिलेटर लावावे लागते. परंतु बरे होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. कोरोनाच्या वाॅर्डात, आयसीयूमध्ये स्वच्छतेविषयी आम्ही काहीही सांगू शकत नाही. आरोग्य कर्मचाऱ्यांवर विश्वास आहे, असे नातेवाईकांनी सांगितले.

नियमित स्वच्छता व्हायला हवी
- व्हेंटिलेटरच्या ईटी ट्यूब आणि ह्यूमीडिपायरची स्वच्छता नियमितपणे होणे गरजेचे आहे, परंतु कोरोनाची दुसरी लाट सुरु झाल्यानंतर रुग्णांची संख्या वाढली आणि त्याकडे काहीसे दुर्लक्ष झाले. म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाल्यानंतर व्हेंटिलेटरच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्यास सुरुवात झाली.
- व्हेंटिलेटर लावल्यानंतर रुग्णाला ड्राय हवा जाऊ नये, यासाठी ह्यूमीडिफायर लावले जाते. यासाठी डिस्टिल वॉटर वापरलेे जाते. डिस्टिल वॉटरऐवजी साधे पाणी वापरल्यामुळे, स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने म्युकरमायकोसिसचा धोका वाढतो. त्यामुळे डिस्टिल वॉटर वापरण्यासह निर्जंतुकीकरण करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले.

स्वच्छतेवर भर
व्हेंटिलेटरची नियमितपणे स्वच्छता करण्यावर भर दिला जातो. त्यासाठी परिचारिका प्रयत्नशील असतात. जिल्हा रुग्णालयात १९ व्हेंटिलेटरवर एकाचवेळी रुग्ण राहिलेले आहेत. पण ही संख्या फार मोठी नाही. त्यामुळे रुग्णांचा फार भार नव्हता. त्यामुळे स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले नाही. आताही काळजी घेतली जाते.
- डाॅ. एस. व्ही. कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक

दुसऱ्या लाटेत....
एकूण रुग्ण-९२,१५०
उपचारानंतर बरे झालेले-८८,५८७
-व्हेंटिलेटर लावावे लागलेले- ७५०
-व्हेंटिलेटर लावल्यानंतर मयत रुग्ण-५०९

Web Title: Corona Virus: Shocking! The second wave killed 509 of the 750 patients on the ventilator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.