corona virus : औरंगाबाद महापालिकेच्या मेल्ट्रॉन कोविड रुग्णालयातून ४८ रेमडेसिविर इंजेक्शन्सची चोरी ; ५ कर्मचाऱ्यांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:59 PM2021-04-28T16:59:09+5:302021-04-28T17:05:27+5:30
48 remedicivir missing from Aurangabad Municipal Corporation's Meltron Covid Hospital रेमडेसिविर इंजेक्शनचा तुडवडा असण्याच्या काळात या बॉक्समधील तबल ४८ वाईल गायब झाल्याने खळबळ उडाली आहे.
औरंगाबाद : महापालिकेच्या मेल्ट्रॉन कोविड रुग्णालयात पाठविण्यात आलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या एका एक बॉक्सची चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. या बॉक्समध्ये ४८ रेमडेसिविर इंजेक्शन होती. या प्रकरणाची महापालिकेने चौकशी सुरू केली असून ५ कर्मचाऱ्यांना नोटीस दिली असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाने, आरोग्य वैद्यकीय अधिकारी नीता पाडळकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
महापालिकेचे चिखलठाणा परिसरात मेल्ट्रॉन कोविड रुग्णालय आहे. या रुग्णालयात २० एप्रिल रोजी रेमडेसिविर इंजेक्शनची २६ बॉक्स भवानी नगर येथील महापालिकेच्या स्टोअर रूममधून पाठविण्यात आले होते. यातील प्रत्येक बॉक्समध्ये ४८ वाईल होते. एप्रिल २३ रोजी मेल्ट्रॉन रुग्णालयात प्राप्त झालेल्या इंजेक्शनची तपासणी करण्यात आली. यावेळी प्राप्त झालेल्या २६ बॉक्स पैक्की एका बॉक्समध्ये रेमडेसिविर ऐवजी एमपीएस हे दुसरेच इंजेक्शन निघाले. रेमडेसिविर इंजेक्शनचा तुडवडा असण्याच्या काळात या बॉक्समधील तबल ४८ वाईल चोरीस गेल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली. या प्रकरणाची महापालिकेने गंभीर दखल घेऊन चौकशी सुरु केली आहे. महापालिकेने पाच कर्मचाऱ्यांना नोटीस दिली आहे. तसेच गरज पडली तर एफआयआर सुद्धा दाखल करण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाने, आरोग्य वैद्यकीय अधिकारी नीता पाडळकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
रुग्णालयात दररोज ३०० इंजेक्शन्सचा वापर
मागील महिन्यात महापालिकेने मेलट्रोन हॉस्पिटलमधील कोविड रुग्णांसाठी थेट कंपनीकडून १० हजार रेमडेसिविर खरेदी केले होते. यानंतर अवघ्या १० ते १२ दिवसांत तब्बल ४ हजार इंजेक्शन्सचा वापर करण्यात आल्याची खळबळजनक बाब समोर आली. ३५० रुग्ण क्षमता असलेल्या रुग्णालयात दररोज ३०० इंजेक्शन्सचा वापर होत असल्याचे पुढे आले होते. इंजेक्शन वापराचे प्रमाण ८५ टक्के ऐवढे असून वापरलेल्या इंजेक्शनचे वाईल सुद्धा रुग्णालयात उपलब्ध नाहीत. यामुळेच रुग्णालयात रेमडेसिविरचा काळाबाजार होत असल्याची चर्चा आहे.