corona virus : औरंगाबादमधील कोरोना संशयिताच्या प्रकृतीत सुधारणा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 12:05 PM2020-03-13T12:05:23+5:302020-03-13T12:07:33+5:30
रुग्णावर ‘सीव्हीटीएस’च्या इमारतीत अतिदक्षतेत उपचार सुरू आहेत.
औरंगाबाद : कोरोनाच्या संशयावरून रुग्णाला तातडीने डॉक्टरांच्या पथकासह रुग्णवाहिकेद्वारे चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. याठिकाणी तपासणी केल्यानंतर त्याला अधिक उपचारासाठी पुन्हा घाटीत हलविण्यात आले. त्याच्यावर ‘सीव्हीटीएस’च्या इमारतीत अतिदक्षतेत उपचार सुरू आहेत. सदर रुग्ण आॅक्सिजनवर आहे.
सध्या त्याला व्हेंटिलेटरची आवश्यकता नसून, त्याची प्रकृती स्थिर आहे. दाखल झाल्यापासून त्याच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झालेली नाही, असे घाटीतील डॉक्टरांनी सांगितले. कोरोना तपासणीसाठी घेतलेल्या स्वॅबचा ४८ तास ते ३ दिवसांत अहवाल प्राप्त होतो, असेही तज्ज्ञांनी सांगितले.
घाटीत कोरोना संशयित रुग्ण दाखल झाल्याची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली आहे. परिणामी, घाटीतील रुग्ण, नातेवाईकांची संख्या रोडावली आहे. बाह्यरुग्ण विभागात दररोज २ ते २,५०० रुग्ण येतात; परंतु अनेकांनी भीतीपोटी गुरुवारी घाटीत येण्याचे टाळल्याचे दिसून आले. ‘ओपीडी’त १,६४२ रुग्णांची तपासणी झाली. घाटीत बहुतांश रुग्ण, नातेवाईक आणि घाटीतील कर्मचारी मास्क, रुमाल लावून ये-जा करताना दिसून आले. रिक्षाचालकांनीही मास्क लावण्यावर भर दिल्याचे दिसून आले.
खबरदारीची सूचना
रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होत आहे. सदर रुग्णाने नारळाचे पाणी घेतले आहे. सध्या प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती मेडिसिन विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी दिली. याठिकाणी उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनाही आवश्यक ती खबरदारी घेण्याची सूचना करण्यात आली आहे. रुग्णाला अचानक व्हेंटिलेटरची गरज भासली तर कोणतीही अडचण होणार नाही, यासाठी ४ व्हेंटिलेटरची व्यवस्था ‘सीव्हीटीएस’मध्ये करण्यात आलेली आहे.