Corona Virus : कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या कामात गांभीर्य नाही; संतप्त उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिले कारवाईचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:01 PM2021-05-20T16:01:31+5:302021-05-20T16:03:34+5:30
Corona Virus:प्रशासनाला चुकीची आकडेवारी देऊन दिशाभूल केली जात आहे, यामुळे ग्रामीण भागात कोरोना वाढत आहे
पैठण ( औरंगाबाद ) : कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे कामच होत नाही. प्रशासनाला चुकीची आकडेवारी देऊन दिशाभूल केली जात आहे, यामुळे ग्रामीण भागात कोरोना वाढत आहे, हे खपवून घेतले जाणार नाही असा इशारा उपविभागीय अधिकारी डॉ. स्वप्निल मोरे यांनी आरोग्य विभागास दिला. ढाकेफळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.
काही ठिकाणी ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा गांभीर्याने काम करत नसल्याने कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याचे भीषण वास्तव उपविभागीय अधिकारी डॉ स्वप्नील मोरे यांनी मंगळवारी आरोग्य विभागाच्या बैठकीत समोर आले. आरोग्य विभागाकडून मिळणाऱ्या आकडेवारीवर जिल्हा प्रशासनाचे नियोजन अवलंबून असते. मात्र, आकडेवारी घरी बसून देणार असाल तर ही प्रशासनाची फसवणूक आहे. याबाबत कठोर पावले उचलण्यात येतील अशी तंबी डॉ. मोरे यांनी दिली. डॉ. मोरे हे पैठण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कामकाजाचा आढावा घेत असून मंगळवारी ढाकेफळ प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या कामकाजाचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची यादी येथे उपलब्ध नव्हती. यावरून येथील कर्मचाऱ्यांनी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची कामेच केली नसल्याचे उघड झाले. या प्रकाराने डॉ. मोरे यांनी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी कर्मचाऱ्यांनी लोक जुमानत नाही हे ठेवणीतील उत्तर देऊन बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावर त्यांचे समाधान झाले नाही.
तालुका आरोग्य अधिकारी डाँ.भूषण आगाज यांनी ढाकेफळ प्रा.आ.केंद्राला वारंवार भेट दिली. मात्र, कामात सुधारणा झाली नाही. याबाबत मोरे यांनी खंत व्यक्त करुन कामचुकार अधिकारी व कर्मचारी यांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवा असे आदेश दिले. ढाकेफळ येथे ३० बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात येईल असे संकेत यावेळी डॉ. मोरे यांनी दिले. ग्रामदक्षता समितीने सक्रिय सहभाग नोंदविण्याची गरज असल्याचेही ते यावेळी म्हणाले. कोरोना टेस्ट वाढवा, दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडा काही अडचण असेल तर संकोच न बाळगता संपर्क साधा असे आवाहन मोरे यांनी बैठकीत केले.
बैठकीस तालुका आरोग्य अधिकारी डॉ भूषण आगाज, वैद्यकीय अधिकारी अतुल बोरे, डॉ.सुदर्शन काळे, ढाकेफळचे सरपंच भिमा मोरे, तलाठी ज्ञानेश्वर साळुंके, पोलीस पाटील गोकुळ आढाव, ढाकेफळ जि.प. शाळेच्या मुख्याध्यापिका सिंधुताई घुले, कैलास ढोले, मुलानी वाडगाव आरोग्य उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गणेश शिंदे, संतोष शिरसाठ, एस.एच.भवर, शिवाजी थोटे, मिलींद गायकवाड, परिचारीका मोलके, ए.डी.कांबळे, चंदा सोनटक्के, उषा गायकवाड, कुलकर्णी, समीना शेख, यशोदा जऱ्हाड, भतनागे, एस.पी.सातपुते, साळवे, ज्योती लिपाने, उषा आव्हाड, विजय गायकवाड, संदिप हानवते, अजय शेजूळ,अंगणवाडी कार्यकर्ती दगडाबाई मुळे, शोभा साबळे, मिरा गोरे, छबाबाई पडोळकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.