corona virus : लस हाच उपाय; लस घेतलेल्या एकाचाही मृत्यू नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 03:28 PM2021-04-24T15:28:28+5:302021-04-24T15:35:03+5:30
vaccine is the remedy for corona virus : आतापर्यंत ३ लाख ७१ हजार १०८ जणांना दिली लस घेतली. त्यात पहिला डोस ३ लाख ३१ हजार १८९ जणांनी घेतला, तर दुसरा डोस ३९ हजार ९१९ जणांनी घेतला
- योगेश पायघन
औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यात एकीकडे ग्रामीण भागात लसीकरणाच्या मोहिमेला गती देण्यात आली आहे, तर शहरात लसीकरण मोहीम जोरात सुरू आहे. जिल्ह्यात पहिली लस घेतल्यावर आतापर्यंत ५० जणांना बाधा झाली, तर दुसरी लस घेतल्यावर १६ जण बाधित झाले. मात्र, लस घेतलेल्यांपैकी एकाही व्यक्तीच्या मृत्यूची नोंद झाली नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
आतापर्यंत ३ लाख ७१ हजार १०८ जणांना दिली लस घेतली. त्यात पहिला डोस ३ लाख ३१ हजार १८९ जणांनी घेतला, तर दुसरा डोस ३९ हजार ९१९ जणांनी घेतला. जिल्ह्यात उद्दिष्टाच्या ३०.८४ टक्के शहरात तर १८.४९ टक्के पहिला डोस, तर दुसरा डोस शहरात ५.२४ तर ग्रामीणमध्ये १.३४ टक्के लोकांनी घेतला आहे. एप्रिलअखेर उद्दिष्टपूर्तीची तयारी आरोग्य विभागाची होती. मात्र, लसींच्या तुटवड्याने लसीकरण मोहिमेची गती कमी झाली आहे. लसीकरणानंतरही मास्क, सुरक्षित अंतर आणि हात स्वच्छ धुण्याची त्रिसूत्री पाळण्याची गरज आहे. लसीकरण केल्यावरही आतापर्यंत ६६ जणांना कोरोनाची बाधा झाली, यात प्रामुख्याने डाॅक्टर, हेल्थकेअर वर्कर्स, फ्रंटलाइन वर्कर्सची संख्या असून, लस घेतल्यानंतर गंभीर होण्याचे प्रमाण फारच कमी दिसून आल्याचे घाटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पहिल्या डोसनंतर जिल्ह्यात केवळ ०.०१ टक्के पॉझिटिव्ह
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. त्यानंतर, आतापर्यंत पहिल्या डोसनंतर शहरात २२ तर ग्रामीण भागात २८ जणांना कोरोनाची बाधा झाली. हे प्रमाण एकूण लसीकरणाच्या ०.०१ टक्के आहे.
दोन्ही डोसनंतर जिल्ह्यात केवळ ०.०४ टक्के पॉझिटिव्ह
आतापर्यंत ३९ हजार ९१९ जणांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला. त्यात शहरातील १२ तर ग्रामीणमधील ४ जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. हे प्रमाण ०.०४ टक्के आहे.
लसीनंतर रुग्ण गंभीर होत नाही
पहिला व दुसरा लसीचा डोस घेतल्यानंतर एकाही मृत्यूची नोंद वाॅररूमकडून प्राप्त माहितीत नाही. लस सुरक्षित आहे. लसीमुळे नंतर बाधा झाली, तरी गंभीर होणारे रुग्ण दिसून आलेले नाही, असे मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ.नीता पाडळकर यांनी सांगितले, तर ग्रामीण भागात लस घेतल्यानंतर एकाही मृत्यूची नोंद नाही. लस महत्त्वाचीच असून, लसीकरण करून त्रिसूत्री पाळण्याचे आवाहन जिल्हा लसीकरण अधिकारी विजयकुमार वाघ म्हणाले.
लस घेतल्यास धोका कमी
शासकीय संस्थांमध्ये सर्वाधिक कोविड बेडची सुविधा देणारी संस्था म्हणून राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची संस्था घाटी आहे. येथे गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गंभीर रुग्णांत एकाही रुग्णाने लस घेतलेली दिसून आलेले नाही. त्यामुळे लस घेतल्याने कोरोनाचा धोका कमी होतो, असे सर्वसाधारण निरीक्षण आहे. मलाही दोन्ही लस घेतल्यावर बाधा झाली. वय, इतर आजार असतानाही मी कोरोनाबाधित काळात गंभीर झाले नाही. त्यामुळे धोका कमी होऊन बरी झाले.
- डाॅ.कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, औरंगाबाद
एकूण रुग्ण - १,१४,४९५
कोरोनामुक्त - ९७,१९८
कोरोनाने मृत्यू - २,२७५
आतापर्यंत एकूण लसीकरण - ३,७१,१०८
केवळ पहिला डोस घेतला - ३,३१,१८९
दोन्ही डोस घेतले - ३९,९१९