चिंताजनक ! ब्रिटन येथून औरंगाबादमध्ये आलेल्या १३ नागरिकांचा नाही ठावठिकाणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 02:54 PM2020-12-26T14:54:11+5:302020-12-26T14:56:36+5:30
corona virus : राज्य सरकारने नवीन विषाणूची खबरदारी घेण्यासाठी महिनाभरात ब्रिटन येथून आलेल्या नागरिकांची सक्तीने कोरोना चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत.
औरंगाबाद : शहरात मागील महिनाभरात ३६ व्यक्ती विदेशातून आल्या. त्यांच्यापैकी १३ जणांचा ठावठिकाणा लागत नाही, अशी माहिती डॉ. नीता पाडळकर यांनी दिली. महापालिकेने ब्रिटन येथून आलेल्या नागरिकांचे सर्वेक्षण सुरु केले आहे. माहिती मिळालेल्या एका महिलेचा कोरोना अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आला असल्याने आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे.
राज्य सरकारने नवीन विषाणूची खबरदारी घेण्यासाठी महिनाभरात ब्रिटन येथून आलेल्या नागरिकांची सक्तीने कोरोना चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा मनपाचे प्रभारी प्रशासक सुनील चव्हाण यांच्या आदेशावरुन महापालिकेने २५ नोव्हेंबर नंतर ब्रिटन येथून शहरात आलेल्या नागरिकांचे सर्वेक्षण सुरु केले. शहरात मागील महिन्यात तब्बल ३६ नागरिक ब्रिटन येथून आले आहेत. त्यापैकी ७ जणांची आरटीपीसीआर पध्दतीने कोरोना चाचणी केली असून सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, १३ जणांचा ठावठिकाणा लागत नाही. त्यांचे फोन नंबर आणि पत्ते आहेत, पण फोन लागत नाही. पत्यांच्या आधारे त्यांना शोधण्यासाठी आता पोलिसांची मदत घेतली जाणार आहे. शुक्रवारी महापालिकेच्या आरोग्य यंत्रणा पत्ते शोधण्यात मग्न होती, पण फारसे यश आले नाही.
पॉझिटिव्ह महिलेच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी पुण्याला
महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मनपा प्रशासन खडबडून जागे झाले. या महिलेला नवीन विषाणूची लागण झालेली आहे किंवा नाही याची तपासणी करण्यासाठी महिलेच्या लाळेचे नमुने पूणे येथील राष्ट्रीय विषाणूजन्य प्रयोगशाळेत (एनआयव्ही) पाठविण्यात आले आहेत.