लग्नसमारंभांवर आधारित व्यवसायांची कोरोनाने लावली वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:04 AM2021-03-28T04:04:47+5:302021-03-28T04:04:47+5:30
जितेंद्र डेरे लाडसावंगी : कोरोनामुळे लग्नसंमारंभांवर बंधने असल्याने यावर आधारित व्यवसायिकांचे चांगलेच दिवाळे निघाले आहे. मंडप डेकोरेटर्स, आचारी, वाजंत्री, ...
जितेंद्र डेरे
लाडसावंगी : कोरोनामुळे लग्नसंमारंभांवर बंधने असल्याने यावर आधारित व्यवसायिकांचे चांगलेच दिवाळे निघाले आहे. मंडप डेकोरेटर्स, आचारी, वाजंत्री, सनई, बॕॅण्डबाजा, फोटोग्राफी आदी व्यावसायिकांचा व्यवसाय सलग दुसऱ्या वर्षीही बंद पडला आहे.
लाडसावंगी परिसरात मागील वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन लावण्यात आला. यामुळे लग्नसमारंभांवर बंधने घालण्यात आली होती. त्यामुळे कोणताही डामडौल न करता गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांनी अगदी साध्या पद्धतीने व मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाह समारंभ पार पाडले. मात्र, लग्नसमारंभांवर आधारित असलेल्या व्यावसायिक यामुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. कोणतेही लग्न म्हटले की, त्यात स्वयंपाकासाठी मंडप डेकोरेशन, आचारी, बॅण्डबाजा, सनई, चौघडा, फोटोग्राफी या व्यावसायिकांना आपोआप काम मिळते. सर्व वर्षभराची कमाई त्यांची लग्नसराईत होत असल्याने त्यांच्यासाठी हा सिझन अत्यंत महत्त्वाचा असतो. मात्र, मागील मार्च महिन्यापासून कोरोनामुळे केवळ पन्नास लोकांच्या हजेरीत लग्न पार पडत आहेत. शिवाय गर्दी जमवल्यास वधू, वर पित्यावर गुन्हे दाखल होत आहेत. यामुळे नागरिकांनी सर्व डामडौल बाजूला सारुन लग्न उरकणे सुरू केले आहे. यामुळे या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. आता लग्नसराई संपण्यासाठी अवघे दोन महिने शिल्लक असताना पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्याने हे व्यवसाय डबघाईला आले आहेत.
कोट
मी मागीलवर्षी लग्नसराईसाठी उसनवारी करून आठ लाख रुपयांचे मंडप व डेकोरेशन साहित्य खरेदी केले होते. परंतु, लॉकडाऊन लागल्यापासून नवीन साहित्य तसेच पडून आहे. या व्यवसायावर तीस ते चाळीस कामगार अवलंबून आहेत. यंदा आठ ते दहा लग्न सोहळ्यांची सुपारी मिळाली होती. मात्र, बंधने आल्याने वधूपित्यांनी ही सुपारी रद्द केली. यामुळे माझे जवळपास पाच लाखांचे नुकसान झाले आहे.
- लक्ष्मण पवार, मंडप डेकोरेटर लाडसावंगी.
कोट
माझ्याकडे लग्नसोहळ्यात स्वयंपाक बनवण्यासाठी बारा तारखा बुक झाल्या होत्या. हे सोहळे ३० मार्च ते ३० एप्रिलदरम्यान होणार आहेत. मात्र, कोरोनामुळे या तारखा रद्द झाल्याचे वधू, वर पित्यांनी सांगितले. माझ्यासोबत वीस कामगार काम करतात.
- इस्माल शेख, स्वयंपाकी, लाडसावंगी.
कोट
लग्नसोहळ्यांमध्ये मी फोटोग्राफी व लाईव्ह व्हिडिओ शुटींगचा व्यवसाय करतो. बँकेकडून नवीन कॕॅमेरा, लाईव्ह चित्रीकरण साहित्य खरेदीसाठी पाच लाख रुपये कर्ज घेतले. मात्र मार्च व एप्रिलदरम्यान मिळालेले काम पुढे ढकलल्याने व्यवसाय संकटात सापडला आहे. शिवाय, माझ्यासोबत पाच जण काम करतात. त्यांचाही रोजगार बुडाला आहे.
-विलास पवार, फोटोग्राफर, लाडसावंगी.